स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकच्या पदरी पुन्हा निराशाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 02:26 PM2018-05-17T14:26:27+5:302018-05-17T14:26:27+5:30
निकाल घोषित : ‘दत्तक नाशिक’ची परवड, कामगिरीवर प्रश्नचिन्ह
नाशिक - मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकची परवड कायम असून केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात सलग तिसऱ्या वर्षी नाशिकच्या पदरी निराशा आली आहे. यंदा ४२०० शहरांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारने विशेष पुरस्कारप्राप्त शहरांची नावे घोषित केली आहे तर पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी खराब प्रदर्शन करणा-या शहरांची यादी घोषित होणार आहे. त्यामुळे, नाशिक आता कितव्या क्रमांकावर राहिले, एवढीच उत्सुकता उरली आहे. दरम्यान, सलग तिस-या वर्षी स्पर्धेत मार खाणाºया नाशिक महापालिकेच्या एकूणच स्वच्छताविषयक कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
शहरांमध्ये स्पर्धेची भावना निर्माण करणे व शहरी क्षेत्रांमध्ये स्वच्छता सुनिश्चित करण्यावर भर देणे, या उद्देशाने केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा निकाल बुधवारी (दि.१६) घोषित झाला. त्यामध्ये महाराष्टतील ९ शहरांना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यात मुख्यमंत्र्यांचे गाव नागपूर हे उत्कृष्ट कार्यशैली असलेले शहर ठरले आहे तर यापूर्वी सर्वात गलिच्छ शहर म्हणून घोषित झालेल्या भुसावळ शहरानेही कामगिरी उंचावली आहे. मात्र, घोषित पुरस्कारांच्या यादीत मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकचा समावेश झाला नाही. मागील वर्षी महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नाशिककडे विशेष लक्ष केंद्रीत करण्याचा संकल्प सोडला आणि सत्ताधा-यांसह प्रशासनाला यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पहिल्या दहा क्रमांकात येण्यासाठी मेहनत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, महापालिकेने सर्वेक्षणापूर्वीच आठ-दहा महिने अगोदर स्पर्धेच्या निकषांनुसार स्वच्छताविषयक कामकाजाला प्रारंभ केलेला होता. शहराची एकूणच स्वच्छताविषयक स्थिती पाहता सत्ताधा-यांसह प्रशासनाकडून यंदा स्पर्धेत नाशिकची कामगिरी निश्चितच उंचावणार, असा दांडगा आत्मविश्वास व्यक्त केला जात होता. परंतु, प्रत्यक्षात देशभरात महाराष्ट दुस-या क्रमांकावर घोषित झाले असताना नाशिकच्या पदरी मात्र सलग तिस-या वर्षी निराशा आली आहे. सर्वेक्षण स्पर्धेतील सविस्तर निकालाची माहिती अद्याप उपलब्ध होेऊ शकलेली नाही. त्यामुळे, नाशिक नेमके कितव्या क्रमांकावर याचा खुलासा झालेला नाही. मात्र, सरकारनेच जाहीर केल्यानुसार आता खराब प्रदर्शन करणा-या शहरांचीच यादी जाहीर होणार असल्याने त्यात नाशिकचा क्रमांक कितवा याबाबतची उत्सुकता उरली आहे.