स्वच्छ सर्वेक्षणात शिक्षकांचीही जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:51 AM2018-12-20T00:51:33+5:302018-12-20T00:52:14+5:30
शिक्षकांनी मनावर घेतलं आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवला तर स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये नाशिक देशातल्या पहिला दहा शहरांमध्ये नक्कीच येईल, असा आशावाद महापौर रंजना भानसी यांनी व्यक्त केला.
नाशिक : शिक्षकांनी मनावर घेतलं आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवला तर स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये नाशिक देशातल्या पहिला दहा शहरांमध्ये नक्कीच येईल, असा आशावाद महापौर रंजना भानसी यांनी व्यक्त केला. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या फिल्ड आउटरीच ब्यूरोतर्फे स्वच्छ भारत मिशन (शहरी) कार्यक्रमांतर्गत मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी आयोजित कार्यशाळेत महापौर भानसी बोलत होत्या. नाशिक महानगरपालिका यांच्या सहकार्याने कार्यशाळा महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर प्रख्यात सफाईतज्ज्ञ श्रीकांत नावरेकर, मनपा शिक्षणाधिकारी उदय देवरे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे, मुख्याध्यापिका साधना गांगुर्डे इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०१९ निमित्त नाशकात सुरू असलेल्या जनजागृती अभियानाची दखल वरिष्ठ स्तरावर घेण्यात आल्याचे सांगितले. यावेळी नाशिक मनपाच्या अंतर्गत येणाºया विविध शासकीय व खासगी शाळांमध्ये स्वच्छता विषयावर आयोजित चित्रकला स्पर्धेच्या विविध गटातील विजेतांना पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकात गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन सदाशिव मलखेडकर यांनी केले.
देश स्वच्छतेकडे : नावरेकर
कार्यक्रमात बोलताना सफाईतज्ज्ञ श्रीकांत नावरेकर म्हणाले की, एकेकाळी जागतिक स्तरावर भारताची गणना सर्वात गलिच्छ देशांमध्ये होत होती. आता हळूहळू हे चित्र बदलत आहे. पण या क्षेत्रात सुधारणा आणि काम करण्यासाठी अजूनही बराच वाव आहे. जर सफाईची कास धरली तर आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासही हातभार लागतो, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. ते म्हणाले की, एकदा स्वच्छता करून परिवर्तन होणार नाही. स्वच्छतेला आपल्या दैनंदिन जीवनाचे अविभाज्य अंग बनवणे करजेचे आहे. स्वच्छतेमागचे विज्ञान समजून घेणे तेवढे आवश्यक आहे.