नेदरलॅन्डचा क्लिन स्विप; ब्राझील-मेक्सिकोची ७-७ने आगेकूच

By admin | Published: June 24, 2014 08:23 PM2014-06-24T20:23:15+5:302014-06-25T00:17:55+5:30

नेदरलॅन्डचा क्लिन स्विप; ब्राझील-मेक्सिकोची ७-७ने आगेकूच

Clean sweep of the Netherlands; Brazil-Mexico 7-7 ahead | नेदरलॅन्डचा क्लिन स्विप; ब्राझील-मेक्सिकोची ७-७ने आगेकूच

नेदरलॅन्डचा क्लिन स्विप; ब्राझील-मेक्सिकोची ७-७ने आगेकूच

Next

आनंद खरे
विसाव्या विश्वचषकाचा साखळीचा शेवटचा टप्पा काल सुरू झाला. या सामन्याआधीच अंतिम १६मध्ये स्थान मिळविणाऱ्या अ गटातील ब्राझील आणि ब गटातील नेदरलॅन्डने विजयासह गटातील आपले पहिले स्थान निश्चित केले. गेल्या विश्वचषकातील उपविजेत्या नेदरलॅन्डने आपला पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यातील फॉर्म कायम राखत चिलीला २-० असे पराभूत करून तीनही विजयासह संपूर्ण नऊ गुण प्राप्त करून पुढील प्रवासाची यशस्वी वाटचाल तर केली. नेदरलॅन्डच्या या विजयाकडे बघितल्यास अगदी शेवटच्या १०-१२ मिनिटांपर्यंत बरोबरी होती. अर्थात नेदरलॅन्ड-चिली या सामन्याचा विचार करता या सामन्याआधीच या दोघांचेही पहिल्या सोळामधील स्थान निश्चित होते. केवळ गटातील पहिला-दुसरा क्रमांक ठरविण्यासाठी याचे महत्त्व होते. मात्र दुसऱ्या स्थानावरील संघाला लगेचच बाद फेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात ब्राझीलशी मुकाबला करावा लागणार असल्यामुळे पहिल्या स्थानासाठी दोघांचेही प्रयत्न होते. या दोघांचीही ६-६ अशी समान गुणसंख्या असूनही सरस गोल सरासरीच्या आधारे नेदरलॅन्डला या सामन्यात बरोबरीही चालण्यासारखी होती, तर चिलीला मात्र विजयच आवश्यक होता. त्यामुळे नेदरलॅन्डला गोल करण्यापेक्षा आपल्यावर गोल होऊ न देणे महत्त्वाचे होते. मात्र विजयासाठी चिलीचे गोल करण्याचेच प्रयत्न होते. त्यासाठी बार्सिलोनाकडून खेळणाऱ्या चिलीच्या अ‍ॅलेक्स सॅचेझने जंग जंग पछाडले आणि वारंवार नेदरलॅन्डच्या गोलपोस्टवर धडका मारल्या. मात्र रॉबीन व्हॅन पर्सी याच्या व्यतिरिक्त खेळणाऱ्या नेदरलॅन्डने कसेही करून आपल्या गोलजवळील चेंडू तटवण्याचा चंग बांधला होता. या खेळामुळे चिलीच्या ताब्यात ६५-६८ टक्के इतक्या जास्त वेळ ताबा होता. प्रति आक्रमणासाठी नेदरलॅन्डचा अर्जेन रॉबेन हा एकटाच पुढे होता. हे सत्र ७०-७२ मिनिटांपर्यंत सुरूच होते. नेदरलॅन्डचे प्रशिक्षक यांनी आपला प्लेमेकर वेलस्ली स्नायडर आणि जेरीमन लेन्स यांना मैदानाबाहेर बोलावून नवीन तरुण रक्ताला वाव दिला आणि त्यांनी बरोबरीची कोंडी फोडली. प्रतिआक्रमणात तरबेज असणाऱ्या अर्जेन रॉबेनने ७७व्या मिनिटाला मध्यरेषेजवळ मिळालेला चेंडू गोलपोस्टसमोर उंचावरून लॉफट केला. या उंचावरून आलेल्या चेंडूचा अचूक अंदाज घेत ताज्या दमाच्या उंचपुऱ्या लोरॉय फर याने उंच उडी घेत डोक्याने चेंडू तटवत बरोबरीची कोंडी फोडली. त्यानंतर पुन्हा प्रतिआक्रमणासाठी मिळालेल्या चेंडूला यावेळी रॉबेनने किक न मारता चेंडूसह अगदी वेगवान स्टाईड घेत चेंडू मैदानाच्या डाव्या कोपऱ्यापर्यंत नेला आणि नेहमीपर्यंत रॉबेन चेंडूला गोलसमोर आणून स्वत: थेट गोलमध्ये किक मारेल हा चिलीच्या बचावपटूंचा अंदाज चूकला. रॉबेनने यावेळी चेंडू डाव्या बाजूने गोलपोस्टसमोर क्रॉस केला आणि मागून धावत आलेल्या दुसऱ्या ताज्या दमाच्या मेम्सी डिपेने आपल्या पायाने चेंडूला गोलची दिशा दाखवत नेदरलॅन्डचा विजय निश्चित केला. आता नेदरलॅन्डचा बाद फेरीचा उपउपांत्यपूर्व सामना २८ जूनला ब गटाचा दुसऱ्या क्रमांकाचा संघ मेक्सिकोशी होईल. ब गटाप्रमाणे अ गटामध्येही ब्राझील-कॅमेरून सामन्यात ब्राझीलचे पहिल्या १६मधील स्थान निश्चित होते, मात्र गटविजेत्यासाठी त्यांना मोठ्या गोलफरकाचा विजय आवश्यक होता. कारण मेक्सिकोचेही ४ गुण असल्यामुळे मेक्सिको विजयी झाल्यास त्यांचेही ७ गुण होणार होते आणि झालेही. तसेच ब्राझीलने कॅमेरूनवर ४-१ असा तर मेक्सिकोने क्रोएशियावर ३-१ असा विजय मिळविला आणि ७-७ समान गुणसंख्या असतानाही ब्राझीलने गोल फरकामध्ये बाजी मारत गटात पहिले स्थान मिळविले. मात्र कॅमेरूनने काही काळ ब्राझीलवर हल्ले करून त्यांच्या गोटात तणाव निर्माण केला होता. या सामन्यातही नेमारने सर्वांच्याच अपेक्षा पूर्ण करत ब्राझीलचे पहिले दोन गोल केले, आणि गोल्डन बुटाच्या शर्यतीत चार गोलसह आघाडी घेतली आहे. ब्राझीलचे दुसरे आघाडीपटू फ्रेड आणि फर्नाडिनीओ यांच्या नावावरही एक-एक गोलची नोंद झाल्यामुळे त्याचाही आत्मविश्वास वाढला आहे, हे ब्राझीलच्या पुढील सामन्याच्या दृष्टीने चांगली बाब आहे. मेक्सिको-क्रोएशिया या सामन्यात क्रोएशियाला संधी असल्यामुळे त्यांनीही मेक्सिकोला चांगलेच सतावले. याही सामन्यात नेदरलॅन्डप्रमाणे मेक्सिकोलाही पहिला गोल करण्यात ७० मिनिट वाट पहावी लागली आणि १ गोल झाल्यामुळे बरोबरीसाठी प्रयत्न करण्याच्या नादात क्रोएशियाचा बचाव थोडा उघडा पडला आणि मेक्सिकोच्या आद्रेस गार्डीडोने दुसरा, तर झेवियर हनीडेझने तिसरा गोल करून आपला विजय निश्चित केला.
स्पेनला विजयाचा दिलासा : पहिल्या दोन्हीही सामन्यातील पराभवामुळे स्पर्धेबाहेर फेकल्या गेलेल्या स्पेनने जाता जाता आॅस्ट्रेलियावर ३-० विजय मिळवून आपल्या चाहत्यांना दिलासा दिला आहे.
आज होणारे सामने : आज फ गटातील इराण आणि बोस्निया-हर्जिगोव्हीना आणि अर्जेंटिना-नायजेरिया हे सामने होत आहे. अर्जेंटिनाचा १६ मध्ये प्रवेश निश्चित आहे, तर बरोबरी अथवा विजयाने नायजेरीयालाही संधी आहे. त्यामुळे या सामन्यात नायजेरीयाचे सुपर ईगल्स मेस्सी आणि कंपनीचा कसा मुकाबला करता त्यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. बोस्नियाचे आव्हान संपलेले आहे, मात्र इराणला मोठा विजय पुढे जाण्यासाठी नायजेरीयाशी डोके लावू शकतो. मात्र इराणने विजय मिळवूनही नायजेरीयाची अर्जेंटिनाशी केवळ बरोबरीही इराणचा विजय व्यर्थ ठरवू शकते. रात्री १.३० वाजता होणाऱ्या इ गटातील फ्रान्स-इक्वाडोर या लढतीत सहा गुणासह फ्रान्सने आपले स्थान निश्चित केलेलेच आहे. मात्र गटातील पहिले स्थान मिळविण्यासाठी तसेच आपली जोराने रूळावर धावणारी गाडी त्याच वेगाने धावावी यासाठी फ्रान्स प्रयत्न करेल. इक्वाडोरचे ३ गुण असल्यामुळे आणि त्यांच्याबरोबरीने ३ गुणांसह स्वित्झर्लंड असल्यामुळे दोघांमध्ये चुरस आहे, मात्र स्वित्झर्लंडची गोल सरासरी दोनने पुढे असल्यामुळे विजयच इक्वाडोरला १६ मधील स्थान मिळवून देऊ शकतो. हुंडारूसला काहीही चान्स नसल्यामुळे या शेवटच्या लढतीत दिलासासाठी विजय मिळविणे हे त्यांचे ध्येय राहील. त्यामुळे हा सामनाही रंगत आणेल याची खात्री बाळगायला हरकत नाही.

Web Title: Clean sweep of the Netherlands; Brazil-Mexico 7-7 ahead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.