जिल्ह्यात जलकुंभांची स्वच्छता व शुद्धीकरण अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 08:55 PM2020-05-29T20:55:30+5:302020-05-29T20:57:40+5:30
ग्रामपंचायतीने गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करणे हे मुलभूत कर्तव्य आहे. यासाठी पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत पिण्याच्या पाण्याचे सर्व जलकुंभ, टाक्या व हातपंप शुद्धीकरण, टी.सी.एल. साठवणूक व नमुना तपासणी, साथीचे आजार इत्यादी विषय अत्यंत महत्वाचे आहेत.
नाशिक : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने येत्या 1 ते 5 जून या कालावधीत जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये जलकुंभांची स्वच्छता व शुद्धीकरण तसेच हातपंपांचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा, शासकीय आश्रमशाळा येथे पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या स्वच्छता व हातपंप शुद्धीकरण अभियान राबविणेबाबतचे निर्देश सर्व गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली.
ग्रामपंचायतीने गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करणे हे मुलभूत कर्तव्य आहे. यासाठी पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत पिण्याच्या पाण्याचे सर्व जलकुंभ, टाक्या व हातपंप शुद्धीकरण, टी.सी.एल. साठवणूक व नमुना तपासणी, साथीचे आजार इत्यादी विषय अत्यंत महत्वाचे आहेत. मान्सून सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १ जून ते ५ जून या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात सदरचे अभियान पूर्ण करण्यात येणार असून यामध्ये ग्रामपंचायत, अंगणवाडी व शाळेत वापरात येणाऱ्या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे रिकाम्या करून त्यातील स्वच्छता करणे व ज्या स्त्रोताचे पाणी पिण्यास वापरले जाते त्याचे क्लोरीनेशन आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक व जलसुरक्षक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याबाबत काळजी घेणे व उपाययोजना राबविणे आवश्यक असून यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, अंगणवाडी व शाळेमधील पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या व हातपंप शुद्धीकरण अभियान राबविणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी जिल्ह्यात सलग तीस-या वर्षी हे अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा, शासकीय आश्रमशाळा येथे पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या स्वच्छता व हातपंप शुद्धीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गावातील सर्व वैयक्तिक नळ कनेक्शन यांना १०० टक्के तोट्या बसविणे, गावातील पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईन ची (स्त्रोत ते शेवटच्या नळ जोडणी पर्यंत ) तपासणी करून गळती असल्यास दुरुस्ती करून सुस्थितीत असल्याची खात्री करणे तसेच. पूरग्रस्त गावांमधील वापरात असलेले पिण्याच्या पाण्याचे स्रोत हे पुराच्या पाण्यामुळे बाधित होतात अशा वेळेस गावातील इतर स्रोतांचा वापर करणेकामी पूर्व नियोजन म्हणून त्याची स्वच्छता व तपासणी करून पाणी पुरवठा करणेस उपयोगात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अभियान राबविलेबाबत ग्रामपंचातीकडून प्रमाणपत्र घेण्यात येणार असून जिल्हा तसेच तालुकास्तरावरुन दैनंदिन स्वरुपात अभियानाचे सनियंत्रण करण्यात येणार आहे..
या अभियानात सर्व ग्रामपंचायतीमध्ये एक कोरडा दिवस पाळण्यात यावा तसेच ग्रामपंचायतींनी सर्व पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे स्वच्छ करून, त्यावर शुद्धीकरण करण्याची तारीख आँईलपेंटने नमूद करावी, पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात टी.सी.एल. उपलब्ध राहील याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले आहे.