पूर ओसरल्याने गोदाकाठची साफसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:17 AM2018-07-21T00:17:49+5:302018-07-21T00:18:08+5:30
गेल्या तीन दिवसांपासून पुराच्या पाण्याने वेढलेल्या गोदावरीचे पाणी ओसरल्यानंतर महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने गोदाकाठ परिसराची साफसफाईची मोहीम गुरुवारी सकाळी हाती घेण्यात येऊन गोदाकाठची मंदिरे व परिसराची साफसफाई करण्यात आली.
पंचवटी : गेल्या तीन दिवसांपासून पुराच्या पाण्याने वेढलेल्या गोदावरीचे पाणी ओसरल्यानंतर महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने गोदाकाठ परिसराची साफसफाईची मोहीम गुरुवारी सकाळी हाती घेण्यात येऊन गोदाकाठची मंदिरे व परिसराची साफसफाई करण्यात आली. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे सलग तीन दिवस गंगाघाट परिसरात पुराच्या पाण्याचे वास्तव्य होते. बुधवारी पावसाचा जोर कमी झाल्याने त्या प्रमाणात गोदावरी नदीचा पूर ओसरला होता. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे पाणवेली तसेच चिखल मोठ्या प्रमाणात वाहून आल्याने पाणवेलींनी परिसरातील मंदिरांना विळखा घातला होता तर मंदिरांमध्ये चिखल व गाळाचे साम्राज्य पसरलेले होते. गोदाकाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन गुरुवारच्या दिवशी पंचवटी आरोग्य विभागाच्या वतीने सकाळी रामकुंड परिसरात साफसफाई करण्यात आली. त्यानंतर रामकुंडकडे जाणारा रस्ता पाण्याने स्वच्छ करण्यात आला. पंचवटी आरोग्य विभाग स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात साफसफाईची मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर तपोवनात असलेल्या लोखंडी पुलावरही मोठ्या प्रमाणात पाणवेली व कचरा अडकलेला होता तोदेखील स्वच्छ करण्यात आला.