दोन कोटी खर्चून आरोग्य केंद्रांची साफसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:12 AM2019-08-04T01:12:35+5:302019-08-04T01:13:45+5:30
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची साफसफाई करण्याचे काम खासगी संस्थेला देण्यात येणार असून, त्यासाठी त्या आरोग्य विभागाने दोन कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढल्या आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रावर एक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नेमण्यात येणार असून, त्याच्यावरच स्वच्छतेची जबाबदारी सोपविली जाणार आहे.
नाशिक : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची साफसफाई करण्याचे काम खासगी संस्थेला देण्यात येणार असून, त्यासाठी त्या आरोग्य विभागाने दोन कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढल्या आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रावर एक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नेमण्यात येणार असून, त्याच्यावरच स्वच्छतेची जबाबदारी सोपविली जाणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता असून, बहुतांशी केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांकडूनच वेळप्रसंगी स्वच्छता करून घेतली जाते, तर कधी कधी रुग्णांची त्यासाठी मदत घेतली जाते. संपूर्ण राज्यातच अशीच परिस्थिती असल्याने त्याची दखल घेत आरोग्य विभागाने सन २०१५-१६ पासून प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्वच्छतेसाठी आउट सोर्सिंग करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी निधीची तरतूद करून दिली आहे. नाशिक जिल्ह्णात १०६ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, त्याच्या वर्षभर साफसफाईसाठी आरोग्य विभागाने सुमारे दोन कोटी रुपयांची निविदा काढली आहे. या निविदेसाठी जी संस्था पात्र ठरेल तिने प्रत्येक आरोग्य केंद्रात एक स्वच्छता कर्मचाºयाची पूर्णवेळ नियुक्ती करायची असून, त्याचबरोबर साफसफाईसाठी लागणारे झाडू, फिनेल आदी वस्तूंही पुरवायच्या आहेत. या स्वच्छता कर्मचाºयाबरोबर निविदा घेणारी संस्था करार करेल त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थेकडे असेल. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गेल्या महिन्यात या कामासाठी दोन कोटी रुपयांच्या निविदा काढल्या असून, त्यासाठी काही संस्थाही पुढे आल्या आहेत. आता निविदाधारकांशी प्री बिडिंग करण्यात येणार असून, सर्वात कमी दरात काम करण्याची तयारी दर्शविणाºया संस्थेला या कामाची वर्कआॅर्डर देण्यात येईल.