नाशकात सफाई कामगारांना आता नालेसफाईचेही काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 06:51 PM2018-05-04T18:51:12+5:302018-05-04T18:51:12+5:30
महापालिका : पावसाळ्यात आरोग्य विभागाकडे जबाबदारी
नाशिक - गेल्या महिनाभरापासून महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत शहरात पावसाळापूर्व नालेसफाईचे काम जोमात सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर मात्र, नालेसफाईची जबाबदारी आरोग्य विभागाकडे सोपविण्यात येणार असून रस्त्यांबरोबरच नालेसफाईचेही काम सफाई कामगारांकडून करुन घेतले जाणार आहे. त्यामुळे, पावसाळ्यात नाले तुंबण्याची परिस्थिती उद्भवणार नसल्याचा दावा महापालिकेच्या सूत्रांनी केला आहे.
महापालिकेमार्फत दरवर्षी पावसाळापूर्व नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. आजवर ही कामे पावसाळा तोंडावर असताना मे-जून मध्ये केली जायची. परंतु, यंदा १ एप्रिल पासूनच शहरातील तुंबलेल्या नाल्यांची सफाई करण्याचे काम महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत घेण्यात आले आहे. बांधकाम विभागामार्फत शहरात ठिकठिकाणी कामे सुरू आहेत. त्या-त्या एजन्सीची यंत्रणा वापरून महापालिकेमार्फत नालेसफाई केली जात आहे. ज्याठिकाणी पावसाळ्यात नाले तुंबण्याची स्थिती उद्भवते, त्याठिकाणी सफाईकामाकडे प्राधान्याने लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. जेसीबीच्या माध्यमातून थेट नाल्यांमध्ये उतरून घाण-कचरा तसेच वाढलेले गवत हटविण्याचे काम सुरू आहे. बांधकाम विभागामार्फत जून पर्यंत सदर नालेसफाईची कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यानंतर, नालेसफाईची जबाबदारी आरोग्य विभागाकडे सोपविली जाणार आहे. पावसाळ्यात रस्ते सफाईचे काम कमी होते. त्या काळात रस्त्यांवर जास्त घाण-कचरा राहत नाही. अशावेळी आरोग्य विभागाकडील सफाई कामगारांमार्फत नालेसफाईची कामे करुन घेतली जाणार आहेत. बऱ्याचदा रस्ते झाडताना सफाई कामगारांकडूनच रस्त्यालगतच्या नाल्यांमध्ये कचरा टाकून दिला जातो. परंतु, रस्त्यांबरोबरच नाले सफाईचीही जबाबदारी सफाई कामगारांवर टाकल्यास त्यांच्याकडून कचरा टाकला जाणार नाही. नाल्यांमध्ये घाण-कचरा टाकणा-या नागरिकांकडून दंड वसुलीचीही जबाबदारी आरोग्य विभागाकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.