२२ हजार नाशिककर करणार नद्यांची स्वच्छता

By admin | Published: June 5, 2015 12:15 AM2015-06-05T00:15:34+5:302015-06-05T00:15:43+5:30

१२५ संस्थांचा सहभाग : ७१ ठिकाणे निश्चित

Cleanliness of 22 Thousand Nashik Roads | २२ हजार नाशिककर करणार नद्यांची स्वच्छता

२२ हजार नाशिककर करणार नद्यांची स्वच्छता

Next

नाशिक : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हरितकुंभांतर्गत शुक्रवारी सकाळी शहरातील चारही नद्यांची स्वच्छता करण्यासाठी २२ हजार नाशिककर सरसावले असून, या मोहिमेला मिळणारा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता काही प्रमुख रस्ते व चौकांचीही स्वच्छता करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरातील शासकीय कार्यालये व स्वयंसेवी अशा १२५ संस्थांच्या माध्यमातून ७१ ठिकाणांवर स्वच्छतेचा जागर होणार आहे.
सकाळी ७ ते ११ या वेळेत होणाऱ्या या स्वच्छता मोहिमेसाठी महापालिका, जिल्हा परिषद, शहरातील शिक्षण संस्था, पंचायत समिती यांच्यासह विविध कामगार संघटना व स्वयंसेवी संघटना सज्ज झाल्या आहेत. सकाळी सात वाजता अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास, राष्ट्रसंत भय्यूजी महाराज, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमीत बग्गा, विभागीय आयुक्त डॉ. एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.
या मोहिमेत पिंपळगाव बहुलापासून ते ओढ्यापर्यंत गोदावरी नदीची स्वच्छता, तर वाघाडी व नंदिनी (नासर्डी) यांच्या उगमापासून गोदावरी संगमापर्यंत तसेच कपिला नदीचीही दुतर्फा स्वच्छता करण्यात येणार आहे. या मोहिमेत २२ हजार नाशिककर नागरिक सहभागी होणार असून, निश्चित केलेल्या ७१ ठिकाणांवर हे काम केले जाणार आहे. प्रत्येक स्वच्छतेचे ठिकाण व त्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. काही कामांसाठी सतरा जेसीबी व तितकेच डंपर तसेच महापालिकेच्या घंटागाड्या कचरा वाहून नेण्यासाठी सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दिवसभरातून शेकडो नागरिक व काही संस्थांनी स्वत:हून अपर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दर्शविल्यामुळे या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Cleanliness of 22 Thousand Nashik Roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.