सह्याद्री प्रतिष्ठानकडून रामशेज किल्ल्यावर स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 06:59 PM2018-11-25T18:59:58+5:302018-11-25T19:00:45+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले व जिंकलेले ऐतिहासिक गडकिल्ल्यांची संगोपन, सरंक्षण व जतन करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. हा ऐतिहासिक ठेवा पुढच्या पिढीसाठी जतन करावा हा हेतूने सह्याद्री प्रतिष्ठानने राज्यातील विविध गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला असून यात सिन्नर तालुक्यातील युवक सहभागी होणार आहेत.
सह्याद्री प्रतिष्ठाने रामशेज किल्ल्यावरही स्वच्छता मोहिम राबवून येथील स्वच्छता करत प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी पदरमोड करत सूचना फलक लावले. येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले. सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक प्रा. श्रमिक गोजमगुंडे, कार्याध्यक्ष नीलेश जेजुरकर यांच्या प्रेरणेतून रविवारी किल्ले रामशेज येथे प्रतिष्ठानच्या नाशिक विभागाकडून ही मोहिम राबविण्यात आली. प्रतिष्ठानचे जिल्हा संपर्क प्रमुख साईनाथ सरोदे, सुनील घोटेकर, विठ्ठल वैराळ, नाशिकचे अजिंक्य महाले, पेन विभागाचे अधिकारी रितेश कदम, कैलास घोटेकर, लक्ष्मण घोटेकर, उद्देश हांडोरे, अभिजीत चांदोरे, सचिन गमे, गीताराम दिघे, जयेश घोरपडे, शशिकांत घोटेकर, बाबासाहेब ढमाले, सतीश अहिरे, आझाद महाले, सचिन मते, गोरक्ष लभडे, समाधान हळदे, कृष्णा मते, नितीन बोडके, रतन भोर, विक्र म घोटेकर आदींसह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, मनमाड, नाशिक, पेन, तळेगाव दिघे, घोटेवाडी, आडगाव नाका येथील अनेक दुर्ग सेवक या मोहिमेत सहभागी झाले होते. रविवारी सकाळी आशेवाडीजवळ दिशादर्शक फलक, गडाच्या पायथ्याशी सूचना फलक, गडावर राममंदिर, भगवती मंदिर, हत्तीखाणा, प्रवेशद्वार, वाड्याचे अवशेष, शिवकालीन भुयार, पाण्याचे टाके आदी ठिकाणी माहिती फलक लावण्यात आले. ऐतिहासिक गडांना अनेक पर्यटक, शिवभक्त भेटी देतात मात्र तेथे माहिती फलक नसल्याने या ऐतिहासिक वास्तूंचे महत्व त्यांना लक्षात येत नाही. त्यामुळे सह्याद्री प्रतिष्ठाणने ‘जागर दुर्ग इतिहासाचा’ या उपक्रमांतर्गत विविध गडांवरील ऐतिहासिक वास्तूंची माहिती जाणून घेत ती सूचना फलकांद्वारे तेथे लावण्याची मोहिम हाती घेतली आहे.