आऊटसोर्सिंगद्वारे शहरात साफसफाई
By admin | Published: May 16, 2017 12:14 AM2017-05-16T00:14:10+5:302017-05-16T00:14:23+5:30
नाशिक : स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले गेल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने आता शहरातील स्वच्छतेवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार केला
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले गेल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने आता शहरातील स्वच्छतेवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार केला असून, जोपर्यंत शासनाकडून सफाई कामगार भरतीला हिरवा कंदील मिळत नाही तोपर्यंत आऊटसोर्सिंगद्वारे शहराची साफसफाई करण्यात येणार असल्याचे महापौर रंजना भानसी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे, लवकरच सफाई कामगार भरतीची प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक मागे पडल्याने त्याचे सारे खापर आरोग्य विभागावर फोडण्यात आले आहे. त्यातच शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत सफाई कामगारांची संख्या खूपच कमी असल्याने कामगार भरतीसाठी लोकप्रतिनिधींसह संघटनांकडून प्रशासनाकडे रेटा वाढला आहे.
शहरातील स्वच्छतेबाबत आरोग्य विभाग दररोज लोकप्रतिनिधींकडून लक्ष्य बनत आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना महापौर रंजना भानसी यांनी आऊटसोर्सिंगद्वारे शहर स्वच्छ करण्याचा निर्धार बोलून दाखविला असून, लवकरच त्याबाबतची कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सफाई कामगारांच्या भरतीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे, परंतु तोपर्यंत शहराच्या स्वच्छतेबाबत तडजोड करता येणार नाही. त्यासाठी तातडीने आऊटसोर्सिंगद्वारे साफसफाई करण्यासाठी प्रक्रिया राबविली जाईल.