स्वच्छता कर्मचाऱ्यांची उघड्यावर ‘डबापरेड’
By admin | Published: August 4, 2015 10:41 PM2015-08-04T22:41:22+5:302015-08-04T22:42:24+5:30
हालच हाल : सोळाशे कर्मचाऱ्यांना ना निवास, ना शौचालय
नाशिक : कुंभमेळ्याच्या काळात स्वच्छतेसाठी उत्तर प्रदेशातून पाचारण करण्यात आलेल्या तब्बल सोळाशे कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. आठवड्याभरापूर्वी मुला-बाळांसह दाखल झालेल्या या कर्मचाऱ्यांची ना निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे ना शौचालयाची. साधुग्राममध्ये एका नाल्याच्या कडेला उघड्यावर राहत असलेल्या यांपैकी काही कर्मचाऱ्यांना साधूंकडूनही अपमानास्पद वागणूक मिळत आहे. एवढेच नव्हे, तर शौचालयांअभावी त्यांना उघड्यावरच नैसर्गिक विधी करावे लागत असल्याने स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
उत्तर प्रदेशातील चार ठेकेदारांकडून प्रशासनाने सफाई कर्मचाऱ्यांना नाशकात बोलावले आहे. अलाहाबाद, बांदा व फतेहपूर जिल्ह्यांतील या कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा देऊ, असे आश्वासन मिळाल्याने ते नाशकात दाखल झाले; मात्र प्रारंभीचे काही दिवस त्यांना उघड्यावरच राहावे लागले. ठेकेदाराकडे तक्रार केल्यानंतर काही कर्मचाऱ्यांची व्यवस्था काही पत्र्याच्या खोल्यांत करण्यात आली, तर उर्वरित कर्मचाऱ्यांच्या हातात मेणकापड देऊन ‘तुम्हीच कोठेही तंबू बांधून घ्या’, असे सांगण्यात आले. या कर्मचाऱ्यांनी नाल्याच्या कडेला तंबू उभारले खरे; पण तेथे वीज, पाण्यासह अन्य कोणत्याही सुविधा नाहीत. शेजारी साधूंची स्नानगृहे, शौचालये आहेत; मात्र तेथून साधू त्यांना हाकलून देत आहेत. यापैकी काही कर्मचाऱ्यांना दिलेल्या पत्र्याच्या खोल्याही अपुऱ्या असून, दहा जणांच्या जागेत पंचवीस कर्मचाऱ्यांना कोंबण्यात आले आहे. बायका-मुलांसह आलेल्या या कर्मचाऱ्यांचे रोजच हाल सुरू असून, या अवस्थेतच त्यांना काम करावे लागत आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४, ४ ते रात्री १२ व १२ ते सकाळी ८ अशा तीन शिफ्टमध्ये त्यांचे काम चालते. दगडांवर चूल करीत त्यावरच हे लोक अन्न शिजवत असून, पाऊस आल्यावर त्यातही व्यत्यय येत असल्याचे यातील काही कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)
साधू म्हणतात, यांना हाकला
साधुग्राममध्ये राहत असलेल्या या कर्मचाऱ्यांना तेथून हाकलण्याची मागणी साधू करीत आहेत. ‘ये लोग सब दूषित कर देंगे’ असे साधूंचे म्हणणे असून, या कर्मचाऱ्यांच्या महिला व मुलांनाही स्नानगृहे, शौचालयांचा वापर करण्यास मज्जाव करीत आहेत.
येणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोखले
नाशिकमध्ये दाखल झालेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनाच राहायला जागा शिल्लक नसल्याने ठेकेदारांनी आता उत्तर प्रदेशातून येणाऱ्या आणखी कर्मचाऱ्यांना रोखले आहे. आहे त्या कर्मचाऱ्यांचेच प्रचंड हाल होत असल्याने वाढीव कर्मचाऱ्यांची डोकेदुखी नको, असा विचार करीत ठेकेदारांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.
चार्जिंगसाठी पाच रुपये!
या कर्मचाऱ्यांना विजेची सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकांचे मोबाइल बंद पडले आहेत. काही जण साधूंकडे व अन्य ठिकाणांहून पाच रुपये देऊन मोबाइल चार्ज करवून घेत आहेत. याशिवाय वीज नसल्याने कर्मचाऱ्यांना रात्रही अंधारातच काढावी लागत आहे.
लपून-छपून शौचालयात
साधू शौचालयात जाऊ देत नसल्याने त्यांची नजर चुकवून स्वच्छता कर्मचाऱ्यांना शौचासाठी जावे लागत आहे. काही कर्मचारी तर कामाच्या ठिकाणीच नैसर्गिक विधी उरकून घेत आहेत. तर काही कर्मचारी उघड्यावरच शौचासाठी बसत असल्याने परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.