नाशिक जिल्ह्यात चित्ररथाद्वारे स्वच्छता सर्व्हेक्षण जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 07:18 PM2019-09-02T19:18:42+5:302019-09-02T19:23:35+5:30
नाशिक जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९ च्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या एल.ई.डी चित्ररथाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : स्वच्छता अभियानाबाबत जनमानसात जनजागृती करून पारंपारिक सवयींबाबत परिवर्तन करणे आवश्यक आहे. शौचालयाचा वापर वाढवून उघड्यावरील हागणदारी पूर्णपणे बंद करण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत असून चित्ररथाद्वारे जास्तीत जास्त गावात जनजागृती करून स्वच्छतेचा संदेश तळागाळात पोहचविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी केले आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९ च्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या एल.ई.डी चित्ररथाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित, बांधकाम सभापती मनीषा पवार मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी.एस तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती उज्वला बावके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना शितल सांगळे यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या कार्यशाळा विविध उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच चित्ररथाद्वारे होणाऱ्या जनजागृतीमध्ये ग्रामस्थ, महिला, शालेय विद्यार्थी यांनी सहभाग घेवून स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये नाशिक जिल्ह्याला चांगले मानांकन मिळविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशादिन शेळकंदे यांनी चित्ररथाबाबत माहिती दिली. सदरचा चित्ररथ हा नाशिक जिल्ह्यातील ७३ गावांमध्ये जनजागृतीसाठी जाणार असून स्वच्छतेचे विविध संदेश, चित्रफीत याद्वारे स्वच्छतेचे महत्व ग्रामस्थांना पटवून देण्यात येणार आहे तसेच मोबाईल अपद्वारे गावातील स्वच्छतेच्या सद्यस्थितीतील प्रतिक्रिया नोंदवण्यात येणार आहे. या प्रतिक्रिया केंद्र शासनाच्या संकेत स्थळावर जाणार असून जास्तीतजास्त प्रतिक्रियेद्वारे राज्यासह नाशिक जिल्ह्याचे मानांकन ठरणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९ मध्ये केंद्र शासनाचे पथकामार्फत सार्वजनिक स्वच्छता, संस्था स्तरावरील स्वच्छता, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा अंगणवाडी, धार्मिक स्थळे बाजारतळावरील स्वच्छता यांची पाहणी होणार आहे.