गोदा शुद्धिकरणासाठी ‘क्लीनटेक’ मशिनरी
By admin | Published: June 5, 2015 12:10 AM2015-06-05T00:10:23+5:302015-06-05T00:11:00+5:30
गोदा शुद्धिकरणासाठी ‘क्लीनटेक’ मशिनरी
नाशिक : गोदावरी नदीपात्रातील निर्माल्यासह तरंगणाऱ्या वस्तू बाहेर काढणारे आणि गोदावरीच्या पाण्यात आॅक्सिजनचे प्रमाण वाढविणारे ‘क्लीनटेक’ मशीन महापालिकेने जिंदाल कंपनीकडून सिंहस्थातील चार महिन्यांच्या कालावधीसाठी भाडेपट्टीने घेतले असून, त्याचा शुभारंभ शुक्रवारी दुपारी ४ वाजता अहल्यादेवी होळकर पुलानजीक होणार आहे.
गोदावरी नदीपात्रात रोज पडणारे निर्माल्य, केरकचरा हटविण्यासाठी ‘क्लीनटेक’ मशिनरी उपलब्ध करण्याची सूचना आर्ट आॅफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी महापालिकेला केली होती. त्यानुसार आर्ट आॅफ लिव्हिंगच्या पाठपुराव्याने व मदतीने नाशिक महापालिकेने जिंदाल कंपनीशी संपर्क साधून ‘क्लीनटेक’ नावाच्या दोन मशिनरी भाडेपट्टीने चार महिन्यांसाठी मागविल्या आहेत.
सदर मशिनरीच्या माध्यमातून नदीपात्रात तरंगणाऱ्या वस्तू बाहेर काढल्या जातात. त्याचबरोबर पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाणही वाढविण्यासाठी या मशिनरीची मदत होते. यामुळे गोदावरीतील प्रदूषणाचा प्रश्न काही प्रमाणात निकाली निघेल.
सदर मशिनरी नाशिकमध्ये दाखल झाल्या असून, त्याचा औपचारिक शुभारंभ महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ५) दुपारी ४ वाजता होणार आहे. (प्रतिनिधी)