मनपा निवडणुकीचा मार्ग मोकळा

By admin | Published: January 5, 2017 02:09 AM2017-01-05T02:09:31+5:302017-01-05T02:09:45+5:30

प्रभागरचना : न्यायालयाने स्थगिती उठविली

Clear the path for the elections | मनपा निवडणुकीचा मार्ग मोकळा

मनपा निवडणुकीचा मार्ग मोकळा

Next

 नाशिक : महापालिकेच्या प्रभाग रचनेला स्थगिती देणारा जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिकेने तयार केलेली प्रभाग रचना सदोष असल्याच्या कारणावरून दाखल झालेल्या दाव्यासंदर्भात जिल्हा सत्र न्यायालयाने प्रभाग रचना ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर ४ जानेवारीस सुनावणी निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती केतकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होऊन न्यायालयाने जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेला स्थगिती आदेश उठवत महापालिकेला निवडणूक प्रक्रिया राबविण्यास परवानगी दिल्याची माहिती विधी विभागाचे प्रमुख बी. यू. मोरे यांनी दिली. उच्च न्यायालयात महापालिकेने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी प्रतिपक्षाचे वकील हजर न राहिल्याने न्यायालयाने एकतर्फी निकाल देत याचिका निकाली काढली.
तसेच निवडणूक प्रक्रियेत यापुढे काही अडचणी उद्भवल्यास पुन्हा उच्च न्यायालयाच्या संबंधित खंडपीठाकडेही येण्याचे निर्देश महापालिकेला दिले. महापालिकेच्या वतीने अ‍ॅड. एम. एल. पाटील यांनी काम पाहिले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, मतदार यादी प्रसिद्ध करण्याबरोबरच आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेसाठी प्रभाग रचना घोषित करण्यात आल्यानंतर हर्षल जाधव यांनी नाशिकच्या दिवाणी न्यायालयात सदोष प्रभाग रचना असल्याचा दावा केला होता. परंतु उच्च न्यायालयाने दोनदा खालच्या न्यायालयाने दिलेले आदेश रद्दबातल ठरविले. (प्रतिनिधी)

Web Title: Clear the path for the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.