शहरातील दोन्ही उड्डाणपुलांचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:20 AM2021-02-17T04:20:18+5:302021-02-17T04:20:18+5:30
२४५ कोटी रूपयांच्या या दोन उड्डाणपुलांसाठी एकूण सहा निविदा प्राप्त झाल्या असून त्या बुधवारी (दि.१७) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत ...
२४५ कोटी रूपयांच्या या दोन उड्डाणपुलांसाठी एकूण सहा निविदा प्राप्त झाल्या असून त्या बुधवारी (दि.१७) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुर करण्यासाठी प्रशासन सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपाची धावपळ सुरू झाली आहे. विशेषत: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलांचे भूमिपुजन करण्यासाठी भाजपचा आटापीटा सुरू आहे.
शहरात मायको सर्कल आणि त्रिमूर्ती चौकात उड्डाण पुल बांधण्यासाठी २४५ कोटी रूपये खर्च होणार आहे. मात्र गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भाजपने एका ठरावान्वये सर्वच प्रभागात रस्त्याची कामे करण्यासाठी ठराव केला असून त्यासाठी तीनशे कोटी रूपयांचे कर्ज काढण्यासाठी प्रशासनाकडे आग्रह धरला होता. मात्र, आयुक्त कैलास जाधव यांनी त्यास नकार दिला. शिवसेनेने देखील रस्त्यांसाठी कर्ज काढण्यास विरोध केला. शह काटशाहच्या राजकारणात भाजपाने मग शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी दोन्ही उड्डाणपुलांचे काम तूर्तास स्थगित करण्याचा ठराव करून तो आयुक्तांना सादर केला आणि आधी रस्त्यांची कामे करावी मगच हे उड्डाणपुल अशी भूमिका घेतली हेाती. मात्र आता येत्या पुढील आठवड्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुलाचा शुभारंभ करण्याचे ठरवण्यात आले आहे.
कोट...
भाजपने उड्डाणपुल रद्द नव्हे तर स्थगित करण्याची भूमिका घेतली हेाती. ज्या कारणासाठी हे सुरू होते, त्या सर्व नगरसेवकांच्या प्रभागात पूर्वनियोजनानुसार आयुक्तांनी एक ते सव्वा कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्याचे अश्वासन दिले हेाते. ते अंदाजपत्रकात दिसेलच.
- जगदीश पाटील, गटनेता भाजपा