पावसाची सर्वदूर हजेरी; इगतपुरीत अतिवृष्टी
By admin | Published: June 24, 2017 06:32 PM2017-06-24T18:32:20+5:302017-06-24T18:32:20+5:30
आषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली असून, इगतपुरी येथे अतिवृष्टी होऊन सर्वत्र जलमय वातावरण झाले तर पेठ व त्र्यंबकेश्वर येथेही दिवसभर पाऊस सुरूच राहिला. नाशिक शहरातही शनिवारी पहाटेपासून पावसाने मुक्काम ठोकल्यामुळे शहरातील जनजीवन दिवसभर विस्कळीत झाले. दरम्यान, पावसाच्या दमदार हजेरीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होऊन धरणांच्या साठ्यातही वाढ होऊ लागली आहे.
यंदा पाऊस सरासरी इतकाच होणार असल्याचा तसेच मान्सून वेळेत दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे पावसाची प्रतीक्षा केली जात होती. मृग नक्षत्रात हजेरी लावून गेलेल्या पावसाने गेल्या दहा दिवसांपासून दडी मारल्यामुळे हवामान खात्याचा अंदाज चुकतो की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. परंतु महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याच्या वृत्ताने सर्व सुखावलेले असताना शुक्रवारी रात्रीपासूनच पावसाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. त्र्यंबकेश्वर येथे शुक्रवारी रात्रीतून ७० मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. शनिवारी पहाटेपासून मात्र पावसाने सर्वत्र जोर धरला. नाशिक शहरातही सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने संततधार लावली. दिवसभर सूर्यदर्शनही दुर्लभ झाले. पावसाच्या हजेरीने हवामानात बदल झाला असून, गारवा निर्माण झाला आहे. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठ, सुरगाणा व इगतपुरी येथे दिवसभर मुसळधार पाऊस झाला. इगतपुरी येथे सायंकाळी पाच वाजेपर्यंत १५७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली तर सुरगाणा येथेही ७४ मिलिमीटर तर त्र्यंबक येथे १२० मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे.