फाइल्स ठेकेदाराकडे देणारा लिपिक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 01:30 AM2021-08-13T01:30:31+5:302021-08-13T01:31:43+5:30
शासकीय कामाची फाइल ठेकेदाराच्या ताब्यात देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाच्या (पूर्व) लिपिकास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. विशेष म्हणजे शासकीय कामाची फाइल ठेकेदार स्वत:च वित्त विभागाकडे घेऊन जात असताना लीना बनसोड यांनी रंगेहाथ पकडले होते.
नाशिक : शासकीय कामाची फाइल ठेकेदाराच्या ताब्यात देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाच्या (पूर्व) लिपिकास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. विशेष म्हणजे शासकीय कामाची फाइल ठेकेदार स्वत:च वित्त विभागाकडे घेऊन जात असताना लीना बनसोड यांनी रंगेहाथ पकडले होते. बुधवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आपल्या दालनाकडे जात असताना वाटेत एक इसम शासकीय कामाची फाइल हातात घेऊन वित्त विभागाकडे जात असताना, बनसोड यांनी त्याला हटकून विचारपूस केली असता तो शासकीय कर्मचारी नसल्याचे लक्षात आले. त्याची विचारपूस करता, लघुपाटबंधारे विभागातून सदरची फाइल त्याने आणल्याची कबुली दिली. या प्रकरणी चौकशी केली असता, लिपिक रवींद्र ठाकूर यानेच ही फाइल दिल्याचे निदर्शनास आले. बनसोड यांनी सदर कर्मचाऱ्याला नोटीस बजावली असता, बुधवारी जिल्हा परिषदेच्या काही कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बनसोड यांची भेट घेऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर काही लोकप्रतिनिधींनीही दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये, यासाठी बनसोड यांच्यावर राजकीय दबाव टाकला. त्यामुळे प्रकरण आणखीनच चिघळले. अखेर, गुरुवारी (दि.१२) दुपारी लिपिक ठाकूर याला निलंबित करण्यात आले. प्रशासनाच्या या कारवाईने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
चौकट===
हा दुहेरी पेच
जिल्हा परिषदेत कामाच्या फायली घेऊन सदस्य, पदाधिकारी तसेच ठेकेदार स्वत:च फिरत असतात. बऱ्याच वेळा कर्मचाऱ्यांचा विरोध डावलून अथवा दमदाटी करून फायली ताब्यात घेतल्या जातात. त्यामुळे कर्मचाऱ्यांचाही नाइलाज होतो. मात्र, जोपर्यंत फाइलशी संबंधित व्यक्ती फाइल घेऊन येत नाही, तोपर्यंत संबंधित टेबलावरील लिपिक पुढील कार्यवाहीही करीत नसल्याची वस्तुस्थिती आहे.