कचऱ्याच्या मालकाचा चतुराईने घेतला शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:34 AM2021-01-13T04:34:49+5:302021-01-13T04:34:49+5:30
दत्त मंदिर रोड महापालिका शाळा क्रमांक १२५च्या मैदानाशेजारी एसटी महामंडळाच्या भूखंडावर चार दिवसांपूर्वी रात्री कुशन कारखान्यातील केरकचरा मोठ्या ...
दत्त मंदिर रोड महापालिका शाळा क्रमांक १२५च्या मैदानाशेजारी एसटी महामंडळाच्या भूखंडावर चार दिवसांपूर्वी रात्री कुशन कारखान्यातील केरकचरा मोठ्या प्रमाणात टाकण्यात आला होता. मनपा घनकचरा विभागास सार्वजनिक ठिकाणी टाकलेल्या कचऱ्याचे फोटो व माहिती मिळाल्यानंतर मनपा विभागीय अधिकारी दिलीप मेनकर, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी यांच्या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण केरकचऱ्याची तपासणी केली. मात्र, केरकचरा कोणाचा आहे व कोणी आणून टाकला याबाबत काहीच ठोस माहिती मिळत नव्हती. कचरा तपासत असताना त्या ठिकाणी केरकचऱ्यात वजनाची पावती मिळाली. त्या वजनकाट्याच्या पावतीच्या आधारे घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वजनकाटा दुकानदाराचा शोध घेऊन ज्या गाडीतून या कचऱ्याचे वजन केले होते त्या गाडीचा नंबर मिळवला. वाहतूक पोलिसांच्या मदतीने त्या गाडीच्या मालक-चालकाचा शोध घेतला. वडाळा गावातील कुशन कारखाना मालक शाहरुख इक्बाल शाहा यांच्या कारखान्यातील तो कचरा असून गाडीचालक अखिलेश चव्हाण रा.भंडारी भवन, शास्त्रीपथ, नाशिक रोड याने तो आणून टाकल्याची कबुली दिली. घनकचरा विभागाने शाहा यांच्याकडून दहा हजार रुपये व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणारा गाडीचालक अखिलेश चव्हाण याच्याकडून पाच हजार असा पंधरा हजाराचा दंड वसूल केला. (फोटो ११ कचरा)