पीएमसी बँकेवरील आर्थिक निर्बंधांमुळे ग्राहकांच्या बँकेत रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 05:15 PM2019-09-24T17:15:00+5:302019-09-24T17:20:08+5:30
रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादल्यामुळे पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँक अडचणीत आली आहे. आरबीआयच्या निर्बंधामुळे बँकेतून पैसे काढण्यावरही मर्यादा आल्याने ग्राहकांनी बँके च्या शरणपूररोडवरील शाखेत सकाळी बँक उघडल्यापासूूनच गर्दी केली. यात काही महिलांनी आपल्या कष्टाची पुंजी परत मिळविण्यासाठी आपल्या लहानमुलांना सोबत घेऊन खात्यामधून पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या.
नाशिक : रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादल्यामुळे पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँक अडचणीत आली आहे. आरबीआयच्या निर्बंधामुळे बँकेतून पैसे काढण्यावरही मर्यादा आल्याने ग्राहकांनी बँके च्या शरणपूररोडवरील शाखेत सकाळी बँक उघडल्यापासूूनच गर्दी केली. यात काही महिलांनी आपल्या कष्टाची पुंजी परत मिळविण्यासाठी आपल्या लहानमुलांना सोबत घेऊन खात्यामधून पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या. परंतु शाखा व्यवस्थापकांनी एका ग्राहकाला केवळ एक हजार रुपयेच देण्याची तयारी दर्शविल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त करीत आपल्या खात्यातून पैसे काढण्याचा आग्रह धरल्याने बँकेत गोंधळ निर्माण झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी (दि.२४) निर्बंध लादल्याने बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी बँकेच्या स्थितीची जबाबदारी स्वीकारत ग्राहकांना सहा महिन्यांत ही परिस्थिती सुधारण्याविषयी आश्वासित केले. मात्र त्याने ग्राहकांचे समाधान झाले नाही. उलट ग्राहकांमध्ये बँक बंद होणार, आपले पैसे बुडणार या भीतीने बँकेच्या शरणपूररोडवरील शाखेत ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी गर्दी करून शाखा व्यवस्थापक आणि कर्मचाºयांना जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यामुळे बँकेत गोंधळ निर्माण झाल्याने बँक प्रशानाने पोलिसांना बोलविले असता पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले तरी ग्राहकांकडून बँकेत पैसे काढण्यासाठी रेटा सुरूच होता. दरम्यान, बँकेने रोख रकमेसोबतच इसीएस आणि एटीएमद्वारे पैसे काढण्याची प्रक्रियाही बंद केल्याने ग्राहकांच्या अडचणीत आणखीनत भर पडली आहे.
बँकेसोबतच स्वप्नांवरही निर्बंध
नाशिकमधील अनेकांनी आपल्या घरासाठी, मुलांच्या लग्नासाठी, वाहन खरेदीसाठी पीएमसी बँकेत आपल्या आयुष्याची जमा पुंजी जमा केली होती. परंतु बँकेवर अचानक निर्बंध आल्याने या सर्वांचेच पैसे अडकले असून, बँकेसोबतच पैसे अडकलेल्या नाशिककरांच्या स्वप्नांवरही निर्बंध आले आहेत. अनेकांनी बँकेच्या अशा स्थितीमुळे आता तोंडावर आलेला दसरा-दिवाळीचा सण कसा साजरा करणार, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.