हवामानातील बदलामुळे उसाला तुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 12:39 AM2020-01-06T00:39:41+5:302020-01-06T00:42:11+5:30
दिंडोरी तालुक्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हवामानातील बदलामुळे सध्या शेतात उभ्या असलेल्या उसाला तुरे आले असून, यामुळे शेतकरी चिंतित आहे. तुऱ्यामुळे उसाच्या वजनामध्ये घट होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
पांडाणे : दिंडोरी तालुक्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हवामानातील बदलामुळे सध्या शेतात उभ्या असलेल्या उसाला तुरे आले असून, यामुळे शेतकरी चिंतित आहे. तुऱ्यामुळे उसाच्या वजनामध्ये घट होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
दिंडोरी तालुक्यात उसाच्या लागवडीखाली २६३८ हेक्टर क्षेत्र आहे. १० आॅक्टोबर २०१९ रोजी लागवड केलेला उसाचा प्लाट असून, तेरावा महिना संपत आला असतानाच उसाला तुरे निघाल्यामुळे वजनामध्ये एकरी एक टन घट येते अशी भीती शेतकरी शंकर कड यांनी व्यक्त केली आहे. कादवा सहकारी साखर कारखान्याने उसाला एका टनाला २७५० रु पये दर नक्की केला असून, तुरे निघाल्यामुळे वजनाचे नुकसान सहन करावे लागणार असल्याचे ऊस उत्पादक सांगत आहेत. कारखान्याने तालुक्यातील उसाची तोड त्वरित सुरु करण्याची मागणीही जोर धरीत आहे.
तालुक्यातील वातावरणातील बदलामुळे एका दिवसात तीनही ऋतूंचा अनुभव मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून हवामानात सातत्याने बदल घडत असल्यामुळे उसाला तुरे येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उसाची उत्पादकता कमी होत आहे. तसेच सध्या सकाळी धुके, दुपारी ऊन, व रात्री थंडी असे वातावरण तालुक्यात जवळपास सगळीकडेच आहे. यामुळे उसाला तुरे येण्याचे प्रमाण वाढले असल्याचे तालुका कृषी अधिकारी अभिजित जगदाळे यांनी सांगितले. उसाच्या वजनात वाढ होण्यासाठी रासायनिक खतांची मात्रा शेतकऱ्यांनी द्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी जगदाळे त्यांनी केले आहे. दिंडोरी तालुक्यात २६५ व ८६०३२ या उसाच्या दोन जातींची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून, उसलागवडीला एकरी ७० हजार रु पये खर्च येत असतो. त्यात उसाच्या बियाणासाठी पाच गुंठ्यांना ४५०० रु पये खर्च येत असल्याचे शंकर कड यांनी सांगितले.