स्मार्ट ग्राम बक्षीस योजनेतून घंटागाडी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 06:28 PM2019-08-01T18:28:31+5:302019-08-01T18:29:10+5:30
तालुकास्तरीय स्मार्ट ग्रामयोजनेत प्रथम पुरस्कार प्राप्त केलेल्या विंचूरदळवी ग्रामपंचायतीने पुरस्काराच्या रकमेतून घंटागाडी खरेदी करत गावात नियमित कचरा उचलण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
विंचूरदळवी : तालुकास्तरीय स्मार्ट ग्रामयोजनेत प्रथम पुरस्कार प्राप्त केलेल्या विंचूरदळवी ग्रामपंचायतीने पुरस्काराच्या रकमेतून घंटागाडी खरेदी करत गावात नियमित कचरा उचलण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, बाजार समितीचे माजी सभापती नामदेव शिंदे यांच्या हस्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले. घंटागाडीच्या माध्यमातून गावात आता नियमित कचरा उचलला जाणार आहे. त्यासाठी विशेष स्वच्छता कर म्हणून ग्रामपंचायतीने प्रत्येक कुटुंबाकडून वर्षाकाठी २०० रूपये रक्कम आकारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनी लोकार्पण सोहळ्याप्रसंगी दिली.
विशेष स्वच्छता कराच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम घंटागाडीच्या देखभाल दुरूस्तीसाठी वापरली जाणार आहे. याप्रसंगी सरपंच संगीता पवार, उपसरपंच भास्कर चंद्रे, सदस्य जयराम दळवी, शांताराम दळवी, दत्तात्रय दळवी, बहिरु दळवी, निर्मला दळवी, भारती दळवी, विमल दळवी, सविता बर्वे, सुनीता भोर, विश्राम पाटील शेळके, संपत चंद्रे, शिवाजी दळवी, युवराज भोर, भाऊसाहेब दळवी, गोरख भोर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पुरस्कारात तालुक्यात अव्वल २०१७-१८ सालीच्या स्मार्टग्राम
पुरस्कार योजनेत स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक उर्जा व पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञान या विषयावर गुणदान करण्यात आले. त्यात विंचूरदळवी ग्रामपंचायतीने १०० पैकी ७९ गुण मिळवून तालुकास्तरावर प्रथम क्र मांक पटकाविला. या पुरस्कारापोटी ग्रामपंचायतीस ८ लाख ३५ हजार ५०० रूपयांचे बक्षीस प्राप्त झाले. त्यानंतर ग्रामपंचायतीने निविदा काढून ट्रॅक्टर व ट्रॉलीची खरेदी करून घंटागाडीचा उपक्र म सुरू केला.