नाल्याची आॅनलाइन ट्रीटमेंट बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 01:52 AM2018-06-06T01:52:07+5:302018-06-06T01:52:07+5:30
नाशिक : नीरीच्या वतीने सोमेश्वरजवळ नाल्यातील प्रदूषित पाण्याचे नैसर्गिक झाडांच्या माध्यमातून शुद्धीकरण करण्यासाठी साकारण्यात आलेला प्रकल्प बंद पडला असून, औद्योगिक क्षेत्रातील हजारो लिटर पाणी गोदापात्रात सहज मिसळले जात आहे.
नाशिक : नीरीच्या वतीने सोमेश्वरजवळ नाल्यातील प्रदूषित पाण्याचे नैसर्गिक झाडांच्या माध्यमातून शुद्धीकरण करण्यासाठी साकारण्यात आलेला प्रकल्प बंद पडला असून, औद्योगिक क्षेत्रातील हजारो लिटर पाणी गोदापात्रात सहज मिसळले जात आहे.
गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केल्यानंतर नीरी या संस्थेचे मार्गदर्शन घेतले. त्याचवेळी नीरीने महापालिकेला हा सल्ला दिला होता. परंतु हा प्रस्ताव नंतर रेंगाळला होता. कालांतराने गोदावरी प्रदूषणासाठी पर्यावरणप्रेमी सरसावल्यानंतर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नदी शुद्धीकरणासाठी हा प्रकल्प साकारण्याचे ठरले होते. त्यानुसार सोमेश्वरजवळील नाल्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा प्रकल्प नीरीने स्वखचाने तयार केला असून, त्यानंतर महापालिकेकडे देखभाल-दुरुस्तीसाठी दिला आहे.
नीरी आणि आयआयटी पवई यांनी संयुक्तरीत्या नैसर्गिक झाडांपासून नाल्यातील प्रदूषणकारी घटक शोषून त्यातल्या त्यात चांगले पाणी प्रवाही करण्यासाठी फायटोईड टेक्नॉलॉजीचा हा प्रकल्प शोधून काढला. ज्याप्रमाणे नदीतील काही प्रमाणात प्रदूषित पाणी नैसर्गिक पद्धतीतील नदीतील काही वनस्पती स्वच्छ ठेवतात, त्याच धर्तीवर या प्रकल्पात शुद्धीकरण होते. दगड आणि खड्यांच्या माध्यमातून एक चौथरा तयार केल्यानंतर त्यात कर्दळी संवर्गातील झाडे लावली जातात आणि त्यांच्या मुळातून नाल्याचे पाणी प्रवाही होईल अशी व्यवस्था केली जाते. त्यामुळे आपोआप पाण्यातील काही प्रदूषणकारी घटक शोषले जातात.
कुंभमेळ्यापूर्वी हा पथदर्शी प्रकल्प साकारून महापालिकेच्या ताब्यात दिल्यानंतर त्याची देखभाल करणे महापालिकेचे काम असतानादेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सध्या या प्रकल्पाची दुरवस्था झाली असून, फेसाळ पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. औद्योगिक वसाहतीतील हे रसायनयुक्त पाणी असून, ते थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने गोदावरी अधिक प्रदूषित होण्यास मदत होते आहे. दुरुस्ती आश्वासनाकडे दुर्लक्षकाही महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी सदस्य तसेच विविध शासकीय अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. त्यावेळी या प्रकल्पाची अवस्था चांगली नव्हतीच. मनपाच्या अधिकाºयांनी याबाबत दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले आहे.