महापालिकेने लागू केलेली कर सवलत योजना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:24 AM2018-04-03T01:24:52+5:302018-04-03T01:24:52+5:30
नागरिकांनी घरपट्टीची बिले मुदतीपूर्वीच भरल्यास त्यांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी महापालिकेने लागू केलेली सवलत योजना आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशान्वये बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आॅनलाइनद्वारे पाणीपट्टीचा भरणा केल्यास त्यासाठी मिळणारी अर्धा टक्का सवलतही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना बिलानुसार घरपट्टी व पाणीपट्टीचा भरणा करावा लागणार आहे.
नाशिक : नागरिकांनी घरपट्टीची बिले मुदतीपूर्वीच भरल्यास त्यांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी महापालिकेने लागू केलेली सवलत योजना आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशान्वये बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आॅनलाइनद्वारे पाणीपट्टीचा भरणा केल्यास त्यासाठी मिळणारी अर्धा टक्का सवलतही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना बिलानुसार घरपट्टी व पाणीपट्टीचा भरणा करावा लागणार आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी घरपट्टीची देयके ही साधारणपणे आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधित वितरित केली जायची. त्यानंतर मिळकतधारकांकडून त्यानुसार भरणा व्हायचा. डॉ. प्रवीण गेडाम हे आयुक्त असताना त्यांनीमिळकतधारकांकडून आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच घरपट्टीची बिले भरली जावीत यासाठी सवलत योजना लागू केली होती. त्यानुसार एप्रिल महिन्यात घरपट्टीचे देयक भरल्यास त्यासाठी ५ टक्के, मे महिन्यात ३ टक्के तर जून महिन्यात २ टक्के सवलत दिली जायची. याशिवाय घरपट्टीच्या देयकाचा आॅनलाइन भरणा केल्यास त्यासाठी १ टक्का तर पाणीपट्टीसाठी अर्धा टक्का सवलत दिली जायची. डॉ. गेडाम यांनी लागू केलेल्या सवलत योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीनच महिन्यांत महापालिकेच्या खजिन्यात घरपट्टीच्या माध्यमातून सुमारे ३० ते ३५ कोटी रुपये जमा व्हायचे. याशिवाय, सवलत योजनेमुळे नागरिकांकडूनही घरपट्टी बिले भरण्याबाबत उत्सुकता दाखविली जायची. मात्र, मुंढे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सदर सवलत योजना गुंडाळून ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मिळकतधारकांना घरपट्टी-पाणीपट्टीची पूर्ण देयके भरावी लागणार आहेत. गेडाम यांनी लागू केलेली योजना अभिषेक कृष्ण यांनीही पुढे चालू ठेवली होती.
सौर ऊर्जेवरील सवलत कायम
आयुक्तांनी घरपट्टी-पाणीपट्टी भरणा करण्यासाठी लागू करण्यात आलेली सवलत योजना बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या मिळकतधारकांसाठी मात्र ५ टक्के सवलतीची योजना कायम ठेवली आहे. आतापर्यंत सौर ऊर्जा वापर करणाºया मिळकतधारकांनी एप्रिलमध्ये घरपट्टीचा आॅनलाइन भरणा केल्यास तब्बल ११ टक्के बिलात सवलत मिळत होती.