राज्यातील १२२ शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण बंद
By admin | Published: December 16, 2015 12:24 AM2015-12-16T00:24:44+5:302015-12-16T00:24:44+5:30
दीड हजार विद्यार्थी मुकणार : सहायक अधिव्याख्याता होणार हद्दपार
नाशिक : पूर्व माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविल्या जाणाऱ्या शाळांपैकी ज्या शाळांमध्ये इयत्ता नववीच्या तुकडीची पटसंख्या साठ आहे, अशा शाळांना एकही शिक्षक कर्मचाऱ्याची नियुक्ती करता येणार नाही. तसेच नवीन शासननिर्णयानुसार नववीच्या चार तुकड्यांपर्यंत सहायक अधिव्याख्याता हे पदही कमी करण्यात आले आहे; मात्र राज्यात नववीच्या चार तुकड्यांपेक्षा जास्त तुकड्या असलेली एकही अशासकीय अनुदानित शाळा नसून अधिव्याख्याता हद्दपार होणार असून, सुमारे १२२ शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पूर्व व्यावसायिक तांत्रिक अभ्यासक्रमांचा तासिकेचा कालावधी आठवड्यातील एकूण तासिका, शिक्षकांचा कार्यभार व प्रात्यक्षिकांची बॅच नव्याने निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार अभ्यासक्रमास दोन तुकड्या अर्थात किमान १२० विद्यार्थ्यांची अट टाकण्यात आली आहे. तसेच प्रात्यक्षिकांसाठी यापूर्वीच्या वीसऐवजी वाढ करून तीस विद्यार्थ्यांची बॅच निश्चित करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील १२२ शाळांमध्ये पूर्व व्यावसायिक तांत्रिक शिक्षणाचा अभ्यासक्रम धोक्यात आला आहे. कारण राज्यात नववीच्या चार तुकड्यांपेक्षा जास्त तुकड्या असलेली एकही अशासकीय अनुदानित शाळा नाही.
व्यावसायिक तंत्रशिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये सहायक अधिव्याख्याता या पदाची शैक्षणिक पात्रता अभियांत्रिकी पदविका अशी आहे. तसेच शाळेतील काम करणाऱ्या शिक्षकांना हे पद समकक्ष असते. केंद्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाने नवीन शासननिर्णय जाहीर करत नवीन अभ्यासक्रम कोअर विषय अंतर्गत लागू केला आहे. या कायद्यातील त्रुटींबाबत न्यायालयात दाद मागण्यात आली आहे; मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नसतानाही गेल्या महिन्यात नवीन आकृतिबंध लागू करण्यात आला. या आकृतिबंधाला स्थगिती देण्याची मागणी राज्य अशासकीय तांत्रिक माध्यमिक शिक्षण कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.