बंद खाते : दहा वर्षांपासून व्यवहार नाही रक्कम शासन जमा करण्याचे निर्देश
By admin | Published: November 1, 2014 10:07 PM2014-11-01T22:07:42+5:302014-11-01T22:08:59+5:30
बंद खाते : दहा वर्षांपासून व्यवहार नाही रक्कम शासन जमा करण्याचे निर्देश
संगमेश्वर : ज्या बॅँक खात्यांमध्ये गेल्या दहा वर्षात कुठलेही व्यवहार झाले नाहीत अशा खात्यातील
जमा राशी शासनाकडे वर्ग करून खाते बंद करण्याचे आदेश रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडियाने काढल्याने बँक खातेदारांत खळबळ उडाली आहे.
नागरिक वा व्यावसायिक प्रतिष्ठांतर्फे आपल्या दैनंदिन आर्थिक व्यवहारासाठी बचत वा चालू खाते बॅँकांत उघडले असते. मात्र गेल्या दहा वर्षात कोणतेही व्यवहार केलेले नाहीत अशी लाखो खाती विविध बॅँकांमध्ये आहेत. या मृतपाय (डेड) खात्यांमुळे बॅँकेच्या दैनंदिन व्यवहारात अनंत अडचणी निर्माण होत आहेत. वर्षानुवर्षे सदर खात्याची नोंद करणे, त्यावरील जमा रकमेचा हिशेब ठेवणे यात सर्व बॅँकांचा वेळ, श्रम व मनुष्यबळ खर्च होत आहे. व्यवहाराअभावी बॅँकेतील नुसतीच खात्यांची संख्या वाढली आहे. अनेकांना तर आपल्या खात्यांची माहितीच नसल्याचेही समजते. अनेक खातेदार बदली झाल्यामुळे बाहेरगावी दूरवर निघून गेले आहेत.अनेक खातेदार अपंग, मृत वा वृद्ध झाल्याने त्यांच्याकडून खात्यात व्यवहार होत नाहीत. अशी खाती बॅँकेसाठी बोजाच ठरत आहेत. असे रिझर्व्ह बॅँकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा सर्व खात्यातील रक्कम रिझर्व्ह बॅँकेकडे वर्ग करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. येथील ज्या बॅँक खातेदारांना याची माहिती मिळाली आहे त्यांनी संबंधित बॅँकेकडे धाव घेऊन आपापल्या खात्याची शहनिशा करून पुढील कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. (वार्ताहर)