बंद एटीएमला एकाचवेळी दोन फलक
By admin | Published: November 3, 2015 09:40 PM2015-11-03T21:40:25+5:302015-11-03T21:42:20+5:30
मालेगाव : ऐन दिवाळीत पैसे काढण्यासाठी धावपळ
मालेगाव : शहरातील एटीएम मशीन नियमित बंद किंवा पैसे राहत नसल्याने नागरिकांच्या प्रश्नाला उत्तरे देऊन कर्मचारीही वैतागले आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा शोधत एटीएममध्ये एकाच फलकाच्या दोन्ही बाजूला दोन वेगवेगळे संदेश लावले आहेत.
देशात नागरिकांना हक्काचे पैसे पाहिजे तेव्हा व सर्वत्र उपलब्ध व्हावे यासाठी एनी टाइम मनी (एटीएम) यंत्राची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात विविध बँकांचे २० पेक्षा जास्त एटीएम मशीन लावण्यात आल्या आहेत. मात्र तरीही सुट्टीच्या दिवशी पैशासाठी गावभर फिरण्याची वेळ एटीएमधारकांवर कायमच येते. शहरातील निम्मे यंत्र रोजच या ना त्या कारणाने बंद असतात. त्यात पैसे नसणे, यंत्र खराब, मेल बंद आदि समस्यांचा समावेश आहे. यामुळे एटीएम यंत्राची सुरक्षा करणारे नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन वैतागले आहेत. यावर एका एटीएम यंत्रात कायमस्वरूपी उपाय शोधला आहे.
मोसमपूल भागातील सटाणारोड ग्रामीण रुग्णालय परिसरात बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलात असलेल्या एटीएम केंद्रात एक फलक लावण्यात आला आहे. या फलकावर एका बाजूला आउट आॅफ सर्व्हिस, तर दुसऱ्या बाजूला आउट आॅफ कॅश असे संदेश लावण्यात आले आहे. त्यामुळे दोघांपैकी एक संदेश दर्शनी भागात झळकत असतो. त्यामुळे हे केंद्र बंद असल्याचा समज होऊन अनेक ग्राहक परत जातात. या प्रकारामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)