बंद कारखाने, नवीन गुंतवणूक, कांदा निर्यातबंदीचीच चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 01:31 AM2019-10-19T01:31:59+5:302019-10-19T01:33:27+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला असला तरी संपूर्ण प्रचारात युतीकडून जम्मू आणि काश्मीर, ३७० कलम रद्द करणे, तिहेरी तलाक हेच मुद्दे चर्चेत आले तर विरोधकांनी मात्र जनतेच्या प्रश्नांना हात घालत नाशिकमधील कारखाने बंद पडत आहेत, नवीन गुंतवणूक नाही आणि कांदा निर्यातबंदीबरोबरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या हेच चर्चेत मुद्दे उपस्थित करून कोंडी करण्यात आली.
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला असला तरी संपूर्ण प्रचारात युतीकडून जम्मू आणि काश्मीर, ३७० कलम रद्द करणे, तिहेरी तलाक हेच मुद्दे चर्चेत आले तर विरोधकांनी मात्र जनतेच्या प्रश्नांना हात घालत नाशिकमधील कारखाने बंद पडत आहेत, नवीन गुंतवणूक नाही आणि कांदा निर्यातबंदीबरोबरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या हेच चर्चेत मुद्दे उपस्थित करून कोंडी करण्यात आली.
निवडणुका म्हटल्या की, जनसामन्यांचे प्रश्न चर्चेत येतात. प्रचाराच्या माध्यमातून त्यावर मंथन होत असते. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घातला जातो. यंदा प्रचारात विरोधी पक्षांनी याच मुद्द्यांना हात घातला. नाशिकमध्ये औद्योगिक क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत एकही नवीन प्रकल्प आला नाही. मेक इन इंडिया, मेक इन नाशिक अशा अनेक घोेषणा झाल्या; परंतु उपयोग झाला नाही, उलट आर्थिक मंदीमुळे नाशिकचे अर्थकारण चालविणाºया बॉश, महिंद्रा आणि अन्य कारखान्यांवर संकट आले असून, त्यामुळे कामगार कपातीचे संकट घोंगावत आहे. त्याच मर्मावर विरोधकांनी बोट ठेवले. यााशिवाय शहरातील गावठाण क्लस्टर, पूररेषा रखडल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यावरदेखील चर्चा अधिक झाली.
ग्रामीण भागात सर्वाधिक मुद्दा कांदा निर्यातबंदीचाच चर्चेत ठरला. निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ग्रामीण भागातील रोष बघता मुख्यमंत्र्यांनी प्रथमच ग्रामीण भागात दौरा करून निवडणुका झाल्या की, तत्काळ कांदा निर्यातबंदी हटविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती करू, असे सांगून रोष शमविण्याचा प्रयत्न केला; मात्र अखेरपर्यंत हा मुद्दा विरोधकांच्या अजेंड्यावर होता. कळवण, चांदवड, देवळा या भागात नार-पारचे पाणीदेखील चर्चेत होते तर आदिवासींच्या आरक्षणाचा मुद्दादेखील चर्चेत असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याबाबतदेखील रोष कमी करण्याचा प्रयत्न केला.
विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे मात्र सरकार पक्षाची दमछाक झाली. त्यांनी त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केला; परंतु सत्तारूढ पक्षाच्या वतीने मात्र त्या तुलनेत सरकारी योजनांचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यापेक्षा त्यांचा भर ३७० कलम, पाकिस्तानला धडा शिकविला, तिहेरी तलाक या मुद्द्यांवरच अधिक होता.
दत्तक नाशिकवरून कोंडी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिक ा निवडणुकीच्या वेळी नाशिक दत्तक घेतल्याचे जाहीर केले होते; मात्र त्यानंतर कोणतीही नवीन गुंतवणूक आली नाही. अनेक कारखाने बंद पडले हा मुद्दा विरोधकांनी पुढे केला असल्याने त्याची बरीच चर्चा झाली. नाशिक पश्चिम मतदारसंघात हा मुद्दा चर्चिला गेला; मात्र भाजपने माकपाच्या युनियनवर त्याबाबत ठपका ठेवून त्यामुळेच नवीन कारखाने आले नसल्याचे सांगून सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला. त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ हा अवघा एक किलोमीटरचा रस्ता, परंतु दोन वर्षांपासून तो रखडला असल्याने तोदेखील चर्चिला गेला.