मतमोजणी केंद्राला जोडणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 01:06 AM2019-05-23T01:06:02+5:302019-05-23T01:06:19+5:30
अंबडच्या सेंट्रल वेअर हाउसमध्ये मतमोजणी केली जाणार असल्याने वेअर हाउसकडे येणारे-जाणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
नाशिक : अंबडच्या सेंट्रल वेअर हाउसमध्ये मतमोजणी केली जाणार असल्याने वेअर हाउसकडे येणारे-जाणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे गुरुवारी औद्योगिक वसाहतीत कामासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
सेंट्रल वेअर हाउसच्या चोहोेबाजूंनी पोलिसांचा सशस्त्र वेढा असून, संपूर्ण परिसरात गुरुवारी मध्यरात्री बारा वाजेपासून ते मतमोजणी संपेपर्यंत वाहतूक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लोकसभेचा निवडणूक निकाल ऐकण्यासाठी गर्दी होणार असल्याने ते टाळण्यासाठी अंबडगाव, पाथर्डी फाटा, डी.जी.पी.नगर, पॉवर हाउस मार्गे वेअर हाउसकडे जाणारा रस्ता तसेच जीएसके, ग्लॅक्सो, संजीवनी बॉटनिकल टी पॉइंट ते वेअर हाउसकडे जाणाºया रस्त्यांवर दुतर्फा बंदी लादण्यात आली आहे. या मार्गावरून फक्त निवडणूक विषयक वाहने तसेच रुग्णवाहिका, अग्निशामक दल, पोलीस व शासकीय वाहनांना अनुमती देण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग हे वापरा
अंबडगावाकडून वेअर हाउसमार्गे संजीवनी बॉटनिकल नर्सरी, जीएसके कंपनीकडे जाणारी वाहने ही एमएसईबी पॉवर हाउसच्या समोरील बाजूने संजीवनी बॉटनिकल गार्डनपासून इतरत्र जातील किंवा एमआयडीसी परिसरातील इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.
मतमोजणी केंद्र असलेल्या सेंट्रल वेअर हाउसच्या शंभर मीटर परिसरात पोलिसांनी जमावबंदी आदेश जारी केला असून, सर्व प्रकारचे हॉटेल, टपºया, व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे.