बंद शिवरस्ता पुन्हा झाला खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:16 AM2021-08-29T04:16:23+5:302021-08-29T04:16:23+5:30
इगतपुरी : शेतजमीन मालकांच्या आडमुठ्या धोरणामुळे पाडळी देशमुख व शेणवड खुर्द येथील विद्यार्थी, शेतकऱ्यांना मुंबई- नाशिक महामार्गावर येण्यासाठी ...
इगतपुरी : शेतजमीन मालकांच्या आडमुठ्या धोरणामुळे पाडळी देशमुख व शेणवड खुर्द येथील विद्यार्थी, शेतकऱ्यांना मुंबई- नाशिक महामार्गावर येण्यासाठी कोसोदूरचा प्रवास गेल्या पंचवीस वर्षांपासून करावा लागत होता. आता रस्त्याची प्रतीक्षा संपली असून, तहसीलदारांच्या उपस्थितीत रस्ता खुला करण्यात आला आहे.
याबाबत नागरिकांनी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याकडे लेखी तक्रार करत न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केली होती.
जमीन महसूल कायद्यान्वये संबंधित रस्त्याचा इतिहास तपासून आडमुठे धोरण स्वीकारलेल्या काही शेतकऱ्यांना तहसीलदारांनी समन्स बजावले व रस्ता मोकळा करण्याचे आवाहन केले होते. गेल्या काही वर्षांपासून गावातील व परिसरातील नागरिक हैराण झाले होते.
शेतकरी तसेच कामगार व विद्यार्थी यांची परवड होत होती. या अगोदर अनेक शासकीय कार्यालयांत स्थानिकांनी लेखी तक्रारी केल्या होत्या. शिवरस्त्यासाठी शेतकरीबांधवांना दाद मिळत नसल्याने त्यांचा नाइलाज होत होता.
मात्र, पाडळी देशमुख व शेणवड खुर्द गावकऱ्यांना कायमस्वरूपी हक्काचा रस्ता मिळाल्याने नागरिकांनी तहसीलदारांचे आभार मानले आहेत.
इन्फो
तहसीलदार ठाण मांडून
काही काळ तहसीलदारांनी परिसरातील शेतकऱ्यांशी हितगुज साधून अडीअडचणी समजून घेतल्या. दोन्ही गावांतील नागरिकांच्या समन्वयातून रस्ता पूर्ण तयार होईपर्यंत तहसीलदार जागेवरच ठाण मांडून होते. पंचवीस वर्षांनंतर रस्ता खुला झाल्याने परिसरातील गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
फोटो : २७ पाडळी देशमुख
इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे बंद असलेला रस्ता खुला करण्यात आला.
270821\440427nsk_32_27082021_13.jpg
फोटो : २७ पाडळी देशमुख इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे बंद असलेला रस्ता खुला करण्यात आला.