केद्राई धरणातून सोडलेले आवर्तन बंद
By admin | Published: January 10, 2016 10:48 PM2016-01-10T22:48:50+5:302016-01-10T22:50:25+5:30
शेतकरी संतप्त : शासनाचा केला निषेध
वडाळीभोई : खडकओझर येथील केद्राई धरणात अत्यंत कमी पाणी साठा शिल्लक असताना या धरणातून देवरगाव - खडकमाळेगाव या कालव्याला ९ दिवसांपासून पाणी सुरू होते.
कालव्याला प्रचंड गळती असल्यामुळे वाहणारे कालव्यातील पाणी नदीत जाऊन नदीवरील छोटे मोठे बंधारे भरून ते पाणी खडकमाळेगावपर्यंत पोहोचले तरी संबंधित विभागाने या वाया जाणाऱ्या पाण्याकडे लक्ष दिले नाही, असा आरोप करीत संतप्त शेतकऱ्यांनी पाणी बंद केले. परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी थेट पाणी बंदचा पवित्रा घेऊन धरणावर जाऊन पाण्याचा विसर्ग बंद केला.यावेळी वडाळीभोईचे सरपंच निवृत्ती घाटे, खडकओझरचे सरपंच विजय पगार, सभापती दत्तू
पगार, तुकाराम पगार, माधव वाघ, तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते. केद्राई धरणातून देवरगावपर्यंत पाणी सोडण्यास हरकत नव्हती, परंतु सोडलेले पाणी निफाड तालुक्यातील माळेगावपर्यंत जाऊन पोहचले त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले याला जबाबदार कोण असा प्रश्न संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
तर केद्राई धरणाच्या पाण्याने वडाळीभोई, खडक ओझर, जोपुळ, भाटगाव आदि गावाची धरणाच्या पाण्याने तहान भागवली जाते.
या परिसरात दुष्काळी परिस्थिती असतानाही एवढे पाणी वाया गेल्यामुळे प्रशासनाने यावर नियंत्रण ठेऊन पिण्यासाठी पाणी राखून ठेवणे गरजेचे असल्याचे मत वडाळीभोईचे सरपंच निवृत्ती घाटे व परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले.(वार्ताहर)