झोडगेत बंद; संपात सहभागी होण्याचा निर्णय
By admin | Published: June 5, 2017 12:05 AM2017-06-05T00:05:23+5:302017-06-05T00:25:07+5:30
ंमालेगाव : राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपास पाठिंबा म्हणून तालुक्यातील झोडगे येथे शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला
लोकमत न्यूज नेटवर्क
ंमालेगाव : राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपास पाठिंबा म्हणून तालुक्यातील झोडगे येथे शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. शुक्रवारी चंदनपुरी शिवारात दुधाचे टॅँकर अडविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना आज जामिनावर सोडण्यात आले. दरम्यान, सोमवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे.
राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपास तालुक्यातून शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त पाठींबा दिला असून शुक्रवारी आंदोलकांनी दुधाचे टॅँकर्स अडविण्याचा प्रकार घडल्याने सतर्कता बाळगता टेहरे, मनमाड चौफुलीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज तालुक्यातील झोडगे येथे शेतकऱ्यांनी संपात सहभागी होत झोडगेत कडकडीत बंद पाळला. ग्रामस्थांनी झोडगे बंदला प्रतिसाद दिला. आज रविवारी बाजार समिती बंद असल्याने बाजार समिती आवारात दिवसभर शुकशुकाट होता त्यामुळे बाजार समितीची उलाढाल बंद होती.
शेतकऱ्यांची बैठक
येथील मराठा दरबार हॉलमध्ये दुपारी ४ वाजता शेतकऱ्यांची बैठक झाली. त्यात शुक्रवारी अटक केलेल्या दहा शेतकऱ्यांना न्यायालयाने जामिनावर सोडल्याने ‘जेल का ताला दुट गया, सत्याग्रही छुट गया’ एकच नारा सातबारा कोरा, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी राजेंद्र भोसले, नाना शेवाळे, अरुण पाटील, लकी गिल, मोहन शेवाळे, गोकुळ शेवाळे यांची भाषणे झाली. यावेळी दादा बच्छाव, दत्तु महाजन, विठ्ठल बागुल यांचेसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज रात्री १२ वाजे पासून सुरू होणाऱ्या राज्यव्यापी संपात क्रांती समिती सहभागी होत आहे. उद्या सोमवारी सकाळी १० वाजता शिवाजी पुतळ्याजवळ क्रांती समितीसह शेतकरी जमा होऊन शहरवासियांना संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मालेगाव येथील मराठा दरबार हॉलमध्ये घेण्यात आलेल्या शेतकरी क्रांती समितीच्या बैठकीप्रसंगी जामिनावर सुटलेल्या आंदोलकांचा सत्कार करण्यात आला.