द्राक्ष पंढरीवर दाटले संकटाचे ढग ; फुलोऱ्यातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 04:44 PM2019-10-20T16:44:18+5:302019-10-20T16:55:02+5:30
ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांना भुरीसह डावणी, करप्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी छाटणी झालेल्या द्राक्षबागा सध्या फुलोऱ्यात असून, अशा बागांना अचानक झालेल्या वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
नाशिक : द्राक्ष पंढरी आणि वाइन कॅपिटल अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांवर ढगाळ वातावरणामुळे विपरीत परिणाम होत असून, गेल्या महिनाभरात ठराविक अंतराने कोसळणाºया पावसानंतर गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांवर डावणी आणि भुरीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. त्याचप्रमाणे सप्टेंबरच्या प्रारंभी छाटलेल्या बागांचे घड जिरण्याचे अथवा कमकुवत येण्याची शक्यता असून, फुलोऱ्यातील द्राक्षबागांचेही या अवकाळी पावसामुळे नुकसान होणार असल्याने द्राक्षबागायतदारांना अचानक झालेल्या वातावरण बदलाचा मोठा फटका बसला आहे.
संपूर्ण हंगामात विशेष काळजी घेऊन जोपासलेल्या द्राक्षबागांचे गेल्या महिन्यातील परतीच्या पावसामुळे नुकसान झालेले असताना त्यातून सावरलेला शेतकरी अचानक झालेल्या वातावरणामुळे पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे प्रचंड आर्द्रता निर्माण झाली असून, नायट्रोजनचे प्रमाणही वाढले आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांना भुरीसह डावणी, करप्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी छाटणी झालेल्या द्राक्षबागा सध्या फुलोऱ्यात असून, अशा बागांना अचानक झालेल्या वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका बसला असून, फुलोऱ्यातील बागांचे घड कमकुवत तयार होणे अथवा प्रारंभिक अवस्थेतच जिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर ऑक्टोबर छाटणीचा कालावधी सुरू असतानाच जिल्ह्यात ढगाळ वातावरण व पाऊस सुरू झाल्याने नव्याने छाटणी करण्यात आलेल्या बागांनाही रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताक्रात झाला आहे.