ढगाळ वातावरणाने दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:49 AM2018-06-04T00:49:53+5:302018-06-04T00:49:53+5:30
नाशिक : जूनच्या पहिल्या दिवसापासूनच हवामानात झालेल्या बदलामुळे मान्सूनपूर्व पावसाने शहर व परिसरात हजेरी लावल्याने शहरात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण व गार वारे वाहू लागल्याने तपमानात कमालीची घट होऊन उष्णतेच्या लाटेत भाजून निघणाऱ्या नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. रविवारी दुपारनंतर अल्प सूर्यदर्शन झाले, परंतु दिवसभर आल्हाददायक वातावरणात नाशिककरांनी त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरीत जाऊन सुटीचा आनंद लुटला.
गेल्या तीन महिन्यांपासून तपमानाचा पारा ३८ ते ४० सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यामुळे शुकशुकाट होणारे रस्ते रविवारी गर्दीने फुलून निघाले होते. एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाºया नाशिककरांना तीन महिन्यांपासून उष्णतेची लाट सहन करावी लागली. सलग ३८ ते ३९ तपमानामुळे नाशिककर घामाघूम झाले होते. दुपारच्या वेळेत तर रस्त्यावरची वर्दळही कमी झाली होती. परंतु जूनची सुरुवात होताच हवामानात तत्काळ बदल झाला. १ जून रोजी दुपारनंतर आकाशात ढगांनी गर्दी करीत, वादळ सुरू झाल्याने काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. शनिवारीदेखील पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे सर्वत्र गारवा निर्माण झाला.
राज्यात अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नसले तरी, मान्सूनपूर्व वातावरणाने मोठा दिलासा दिला आहे. दि. ३० मे ते ३ जून या पाच दिवसांत तपमानात मोठी घट झाली असून, शनिवारी ३५ सेल्सिअस असलेले तपमान रविवारी घसरून २८ वर पोहोचले.
ढगाळ हवामान, सोसाट्याच्या वाºयामुळे आल्हाददायक वातावरण तयार झाल्याने नाशिककरांनी रविवारची सुटी आनंदात घालविली. अनेकांनी त्र्यंबकेश्वर, कसारा घाटाकडे धाव घेत निसर्गाचा आनंद लुटला.