ढगाळ वातावरणाचे दिवाळीवर सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 01:45 AM2018-11-06T01:45:22+5:302018-11-06T01:46:38+5:30
शहरात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना रविवारी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानंतर सोमवारी (दि.५) धनत्रयोदशीलाही ढगाळ वातावरणामुळे शहरवासीयांमधील दिवाळीच्या उत्साहावर पावसाचे सावट दिसत होते.
नाशिक : शहरात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना रविवारी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानंतर सोमवारी (दि.५) धनत्रयोदशीलाही ढगाळ वातावरणामुळे शहरवासीयांमधील दिवाळीच्या उत्साहावर पावसाचे सावट दिसत होते. शहरातील बाजारपेठा तेजीत असताना रविवारी अचानक जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे नागरिकांची आणि रस्त्यावरील विक्रेत्यांचीही धावपळ उडाली असताना सोमवारीही ढगाळ वातावरण असल्याने हीच परिस्थिती आजही पुन्हा उद्भवणार की काय अशी शंका नाशिककरांच्या मनात होती. त्यामुळे रस्त्यावर विक्री करणारे फेरीवाले त्यांचा माल झाकण्यासाठी आवश्यक साहित्याच्या तयारीत दिसून आले. नागरिकांनीही वातावरणाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडून खरेदी केली. वातावरणात दुपारनंतर बदल होऊन पावसाची शक्यता कमी झाल्याने बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. धनत्रयोदशीच्या दिवशी मौल्यवान दागिन्यांसह लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक साहित्याचीही नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.
मूर्तीला मागणी
लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त अवघा एका दिवसावर येऊन ठेपल्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक केरसुणी, लाह्या, बत्तासे आदी साहित्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनासाठी महालक्ष्मी मूर्तींनाही मागणी वाढल्याचे दिसून आहे. अनेकांनी चांदीची लक्ष्मी मूर्ती घडवून घेतली असून, ते या लक्ष्मीपूजेला याच चांदीच्या मूर्तीचे पूजन करणार आहेत.