दुसºया दिवशीही ढगाळ वातावरण; तुरळक सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:59 PM2017-11-21T23:59:38+5:302017-11-22T00:29:30+5:30
गेल्या दोन दिवसांपासून शहरात ढगाळ हवामान आणि तुरळक पाऊस असल्याने ऐन हिवाळ्यात नाशिकरांना काहीसा उकाडाही जाणवू लागला आहे. पश्चिमेकडील राज्यांमध्ये झालेल्या बर्फवारी आणि पर्जन्यामुळे राज्यातील हवामानावर परिणाम झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून शहरात ढगाळ हवामान आणि तुरळक पाऊस असल्याने ऐन हिवाळ्यात नाशिकरांना काहीसा उकाडाही जाणवू लागला आहे. पश्चिमेकडील राज्यांमध्ये झालेल्या बर्फवारी आणि पर्जन्यामुळे राज्यातील हवामानावर परिणाम झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. येत्या दोन-तीन दिवसांत पावसाबरोबरच थंडीची लाटही येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यातील अनेक भागांत पाऊस होऊ शकेल, असा अंदाज हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच वर्तविला होता. सोमवारी आणि मंगळवारीही झालेल्या पावसामुळे थंडीतही काहीसा उकाडा जाणवला. नाशिकचे तपमान १३ अंश सेल्सिअसवरून थेट १८.८ अंशांवर पोहचले आहे. मागील आठवड्यात नाशिकचे तपमान राज्यात सर्वांत कमी दहा अंशांवर जाऊन पोहचले होते. त्यानंतर सातत्याने तपमानात वाढ होत गेली. ११, १२ आणि रविवारी १३ अंश सेल्सिअस इतक्या तपमानाची नोंद करण्यात आली होती. परंतु राज्यात पर्जन्याची शक्यता वर्तविल्यानंतरही तपमान मात्र १८.८ अंशांवर जाऊन पोहचले. येत्या दोन दिवसांत राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचा परिणाम नाशिकमधील वातावरणावरदेखील होण्याची शक्यता असून, येत्या दोन-तीन दिवसांत ढगाळ वातावरणाबरोबरच तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतपिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. काढून ठेवलेल्या धान्याला बुरशी लागण्याचा धोका निर्माण झाला आहे, तर पिकांवर रोग पडण्याचीदेखील शक्यता वर्तविली जात आहे. भाजीपाला, फळभाज्या पिकांवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.