ढगाळ वातावरणाने द्राक्षपीक धोक्यात
By admin | Published: February 20, 2016 09:23 PM2016-02-20T21:23:34+5:302016-02-20T21:24:14+5:30
ढगाळ वातावरणाने द्राक्षपीक धोक्यात
वणी : परिसरात शेतकरी चिंतितवणी : कांद्याच्या दरातील घसरणीमुळे अगोदरच शेतकरी मेटाकुटीस आला असताना आता ढगाळ वातावरणाने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दिंडोरी तालुक्यात कांदा व द्राक्षे या पिकांचे मोठा प्रमाणावर उत्पादन घेण्यात येते; मात्र कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक व परराज्यातील उत्पादनामुळे कांद्याच्या दरात घट झाल्याने उत्पादकांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. तालुक्यात इतरांच्या तुलनेत सदर नगदी पीक घेण्याकडे कल आहे. हजारो एकर द्राक्षबागांची लागवड तालुक्यात आहे. परराज्याबरोबर परदेशातही तालुक्यातील द्राक्षांचा नावलौकिक आहे. मात्र सद्यस्थितीतील प्रतिकूल वातावरण द्राक्षास मारक आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांमधील साखर कमी होते. त्यामुळे नैसर्गिक गोडीवर त्याचा परिणाम होतो. तसेच काही रोगाचाही प्रादुर्भाव होतो त्यामुळे ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तारेवरची कसरत उत्पादकांना करावी लागते, अशी माहिती उत्पादकांनी दिली.
द्राक्षांवर वर्षभराचे आर्थिक नियोजन उत्पादकांचे अवलंबून असते. उदरनिर्वाहाबरोबर कौटुंबिक जबाबदारी, शेती व्यवसायास लागणारा तत्सम खर्च, कर्ज या सर्व बाबी त्यावर अवलंबून असतात. समाधानकारक व अपेक्षित दर
मिळाले तर जबाबदारीचे चक्र पूर्ण होते, नाहीतर उत्पादक आर्थिक
कोंडीत अशा अनाहुत संकटामुळे सापडतात. (वार्ताहर)