दिंडोरी तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 12:56 AM2021-10-09T00:56:47+5:302021-10-09T00:57:07+5:30
दिंडोरी तालुक्यात शुक्रवारी (दि. ८) सलग चौथ्या दिवशी परतीच्या पावसाने हजेरी लावली. कादवा कारखाना, वरखेडा, मातेरेवाडी, जोपूळ, लोखंडेवाडी परिसरात विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह ढगफुटीसदृश पाऊस होत सर्वत्र पाणीच पाणी झाले. लासलगावलाही जोरदार पाऊस होऊन कांदा भिजून मोठे नुकसान झाले तर सुरगाणा शहरापासून जवळच अंतरावर असलेल्या दुर्गापूर येथे वीज पडून गाभण असलेली गाय ठार झाली आहे.
दिंडोरी : तालुक्यात शुक्रवारी (दि. ८) सलग चौथ्या दिवशी परतीच्या पावसाने हजेरी लावली. कादवा कारखाना, वरखेडा, मातेरेवाडी, जोपूळ, लोखंडेवाडी परिसरात विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह ढगफुटीसदृश पाऊस होत सर्वत्र पाणीच पाणी झाले. लासलगावलाही जोरदार पाऊस होऊन कांदा भिजून मोठे नुकसान झाले तर सुरगाणा शहरापासून जवळच अंतरावर असलेल्या दुर्गापूर येथे वीज पडून गाभण असलेली गाय ठार झाली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. दिंडोरी तालुक्यातही ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे दिंडोरीतील चिखली नाल्याला मोठा पूर जात नाल्याशेजारील शेतीचे नुकसान झाले. द्राक्ष बागा, भाजीपाला पिकातून पाण्याचे लोंढे वाहू लागले. नुकत्याच छाटणी झालेल्या द्राक्षबागांना या पावसामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे, तर टोमॅटोसह विविध भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. काढणीस आलेल्या सोयाबीन भुईमुगाचे नुकसान झाले आहे. दिंडोरी, वलखेड, पालखेड कोराटे लखमापूर, खेडगाव, जानोरी, मोहाडी आदी विविध गावांनाही जोरदार पाऊस झाला आहे. दिंडोरी शहरात काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, पालखेड बंधारा पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सायंकाळी ४.३० वाजता पालखेड धरणातून पाण्याचा जास्त विसर्ग करण्यात आला. त्यामुळे कादवा नदीलाही पूर आला आहे.
इन्फो
लासलगावला धुवाधार बॅटिंग
लासलगाव : गेल्या दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर लासलगाव परिसरात पावसाची एक तासाहून अधिक वेळ जोरदार बॅटिंग झाली. पावसाने पुन्हा लासलगाव व परिसराला झोडल्याने पुन्हा पाणीच पाणी साचले. यादरम्यान ५० मिलीमीटर इतका पाऊस झाल्याची नोंद लासलगाव बाजार समितीच्या केंद्रावर झाली. जोरदार पावसाने शेतकरीवर्गाचे तसेच व्यापारीवर्गाने खरेदी केलेला कांदा मोठ्या प्रमाणात भिजला. लासलगावजवळील ब्राम्हणगांव विंचूर येथे पावसाने अक्षरश झोडपून काढले. पावसामुळे सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले.
इन्फो
दुर्गापूर येथे वीज पडून गाय ठार
सुरगाणा : सुरगाणा शहरापासून जवळच अंतरावर असलेले दुर्गापूर येथील शेतकरी नारायण खंडू पवार रा. करवंदे यांच्या शेतजमिनीत शुक्रवारी (दि.८) दुपारी दोन वाजेच्या दरम्यान वीज पडून गाभण असलेली गाय ठार झाली आहे. शेतजमीन गट नं.२८ मध्ये वडाचा माळ या ठिकाणी ही गाय दुपारचे वेळी चरत होती. या दरम्यान दीड वाजेच्या सुमारास वीज अंगावर पडल्याने गाय जागीच ठार झाली. त्यामुळे शेतकऱ्याचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे तलाठी प्रकाश कडाळे यांनी पंचनाम्यात म्हटले आहे. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किरण आठरे यांनी पशुचिकित्सक श्रीकांत पवार, भावेश देशमुख यांना तत्काळ घटनास्थळी पाठवून शवविच्छेदन करण्यात आले आहे. यावेळी पोलीस पाटील भागवत सहारे उपस्थित होते. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी करवंदे येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाला होता.