ढगाळ वातावरण : कांदा, डाळींब, गहू, हरबऱ्यावर औषध फवारणी
By admin | Published: January 24, 2015 11:07 PM2015-01-24T23:07:54+5:302015-01-24T23:08:07+5:30
पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव
ब्राह्मणपाडे : मोसम खोऱ्यात गेल्या काही महिन्यांपासून सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे कांदा पिकावर करपा व मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. त्यामुळे शेतकरी पीक वाचविण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करताना दिसून येत आहे.
मोसम खोऱ्यासह परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. कांदा पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते; मात्र चालू वर्षी निसर्ग जणू काय शेतकऱ्यांची कसोटी पाहत आहे.
वटार : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या वटार, चौंधाणे येथे सकाळपासून वातावरणात अचानक बदल होऊन दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे कांदा, डाळींब, गहू, हरबरा या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. परिसरात यंदा बराच काळ थंडीचा जोर असल्यामुळे रब्बी पिके जोमात होती; पण गेल्या काही दिवसांपासून परिसरातील वातावरणात बदल झाला. वातावरणात धड थंडी नाही व धड उन्हाळा नाही, असे ढगाळ व रोगट स्वरूपाचे होते. परिणामी कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात मावा, करपा, पिवळेपणा येणे अशा प्रकारच्या रोगांनी मोठ्या प्रमाणात आक्रमण केले. त्यामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान होऊन उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तसेच डाळींब पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची चिन्हे आहेत. सततच्या वातावरणातील बदलामुळे डाळींब उत्पादक शेतकरी महागडी औषधे फवारणी करून ऐन फळ जोर बसण्याच्या वेळेत निसर्ग लहरीपणा करतो. तोंडात येणारा घास हिसकावला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे. या ढगाळ वातावरणामुळे संकटाचेच ढग घुमत आहेत. (वार्ताहर)