देवगाव परिसरातील पिकांना ढगाळ हवामानाचा फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 03:51 PM2020-12-15T15:51:27+5:302020-12-15T15:52:20+5:30
देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव परिसरातही रिमझिम पावसाने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सलग तीन दिवसांपासून ढगाळ हवामानासह पावसाने हजेरी सुरुच ठेवली असून मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाल्याने थंडीतही वाढ झाली आहे. त्यामुळे गहू, हरभरा, कुळीद, बाजरी, तूर व भात आदी रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच खरिपाची मळणी करुन जागेवर ठेवण्यात आलेल्या चाऱ्याचा या पावसामुळे प्रश्न निर्माण झाल्याने नुकसान बाधित शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडली आहे.
तीन दिवसांपासून हवामान बदलाने पडणाऱ्या बेमोसमी पावसामुळे देवगावसह वावीहर्ष, टाकेदेवगाव, श्रीघाट, येल्याचीमेंट, चंद्राचीमेंट,आव्हाटे, डहाळेवाडी, टाकेहर्ष आदी गावांत शेतकऱ्यांनी कापणी केलेले व खळ्यावर गंजी रचून ठेवलेल्या भाताची उडवी भिजल्याने पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या प्रारंभी पावसाची प्रतीक्षा व नंतरच्या काळात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भात शेती नष्ट झाली. पावसापासून वाचवलेल्या पिकांची कापणी करून खळ्यावर मळणीसाठी तयार असलेल्या भातात आता पावसाचे पाणी शिरल्याने उरलेसुरले धान्यदेखील भिजून वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. खळ्यावर रचून ठेवलेल्या भाताच्या उडव्याची पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्लास्टिक ताडपत्रीच्या साहाय्याने झाकणी केली आहे. परंतु, प्लास्टिक ताडपत्री किंवा इतर काही साधन नसलेल्या शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.