ढगाळ वातावरणामुळे द्राक्षपंढरी हादरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:30 AM2020-12-13T04:30:09+5:302020-12-13T04:30:09+5:30
सायखेडा : बेमोसमी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पंढरी पुन्हा हादरली असून; द्राक्ष उत्पादक शेतकरी फवारणीच्या वाढत्या खर्चामुळे ...
सायखेडा : बेमोसमी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पंढरी पुन्हा हादरली असून; द्राक्ष उत्पादक शेतकरी फवारणीच्या वाढत्या खर्चामुळे हवालदिल झाले आहेत.
दोन दिवसांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या बेमोसमी पावसाचे आणि ढगाळ वातावरण तयार झाले आहे. कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची संकटांनी यंदाही पाठ सोडली नाही. मागील वर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या शेवटी आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने जेरीस आणले आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पाऊस पडत आहे. द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. शेतकऱ्यांच्या अनेक बागा दोडा आणि फ्लॉवरिंग अवस्थेत आहेत. दोडा आणि फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये असणाऱ्या बागांना जास्त फटका बसून त्याची गळ आणि कुज होते. ढगाळ हवामानाचा फटका द्राक्ष बागांना बसतो. गेल्या काही दिवसांपासून वातावरण ढगाळ असल्याने द्राक्ष बागांना पुरेसे ऊन मिळत नाही आणि त्यामुळे भागांची गळ, कूच होऊ लागली आहे. निफाड तालुक्यातील ३५ टक्के द्राक्षबागा गळीने खराब झाल्या आहेत. यामुळे द्राक्ष पंढरीला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
----------
पिकांना सातत्याने फवारणी करावी लागत असल्यामुळे खर्चात वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. उत्पादनापेक्षा खर्च जास्त होत असल्यामुळे द्राक्ष पीक यंदा तोट्यात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
--------------------------
दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या लाखो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या द्राक्ष बागा पुन्हा एकदा संकटात सापडल्या आहेत. द्राक्ष पंढरीमध्ये मोठ्या प्रमाणातील बागा आता फ्लॉवरिंग, दोडा अवस्थेत असल्याने या भागांची गळ व कूज होण्यास सुरुवात झाली आहे.
- सचिन डेर्ले, द्राक्ष उत्पादक, शिंगवे.
(१२ सायखेडा)
===Photopath===
121220\12nsk_2_12122020_13.jpg
===Caption===
(१२ सायखेडा)