ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना धोका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:19 AM2021-09-09T04:19:09+5:302021-09-09T04:19:09+5:30
नाशिक : पावसाळा सुरु झाल्याने आर्द्रतेमध्ये वाढ झाली असून, हानिकारक वायूंच्या प्रमाणात वाढ झाल्याने दम्याच्या रुग्णांना योग्यप्रकारे श्वास घेण्यास ...
नाशिक : पावसाळा सुरु झाल्याने आर्द्रतेमध्ये वाढ झाली असून, हानिकारक वायूंच्या प्रमाणात वाढ झाल्याने दम्याच्या रुग्णांना योग्यप्रकारे श्वास घेण्यास अडचण येते. ज्येष्ठ नागरिकांसाठी दम्याचा झटका (ॲटॅक) प्राणघातक ठरू शकतो. तर तरुणांनाही ढगाळ वातावरणामुळे अस्थमाचा त्रास जाणविण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाळा सुरू झाला की, सर्दी आणि फ्लूमुळे दम्याच्या रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा या रुग्णसंख्येत खूपच वाढ होत आहे. पावसानंतरचे दमट वातावरण आणि अतिथंड वातावरण यामुळे दम्याचा विकार बळावू शकतो. नवीन घर किंवा धाब्याचे घर किंवा वाड्याच्या ओलसर भिंती यामुळे हा गारठा आणि कोंदटपणाने अस्थमा रुग्णांना सर्वाधिक त्रासाचा सामना करावा लागतो. तसेच जळणारा कचरा व खाण्यापिण्याच्या सवयीत झालेला बदल आदी कारणांमुळे अस्थमा रुग्णांची संख्या वाढत आहे.
इन्फो
बालकांमध्ये अस्थमात वाढ
शहरात मेट्रो व सिमेंट रस्त्यांच्या कामांसह इतरही बांधकामामुळे सतत उडणारी धूळ, मुलांचे कायमचे घरात थांबणे, व्यायामाचा अभाव तसेच खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळेदेखील बालकांमध्ये अस्थमा वाढत आहे. भारतात सहापैकी एका बालकाला अस्थमा असल्याचे राष्ट्रीय पाहणीतून समोर आले आहे.
इन्फो
ही घ्या काळजी
अगरबत्ती, धूप स्टिक, डासांपासून बचाव करणाऱ्या कॉईल, पर्फ्युम आणि डिओडरंटचा वापर टाळावा. नियमित इन्हेलरचा वापर करण्यासह श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करा. पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक असते. तसेच पाळीव प्राण्यांमुळे दम्याची लक्षणे आणखी वाढण्याची शक्यता असते. यासाठी त्यांना खोलीबाहेर ठेवणे आवश्यक असते. तसेच रोगप्रतिकारशक्ती उत्तम करण्यासाठी नियमित पौष्टिक आहाराचे सेवन करावे. जंकफुड, मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन टाळण्याची दक्षता घ्यावी.
कोट
पावसाळी काळात ज्येष्ठ नागरिकांच्या आणि बालकांच्या अस्थम्याच्या त्रासात वाढ होते. त्यामुळे ज्यांना पूर्वीपासून दम्याचा त्रास आहे, अशा नागरिकांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.
- डॉ. अतुल वडगावकर, एम. डी.