शाळकरी विद्यार्थ्यांचा पातेल्यातून जीवघेणा प्रवास; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कामाला सुरुवात, गावकऱ्यांना आनंदाश्रू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 04:31 PM2024-01-08T16:31:58+5:302024-01-08T16:45:08+5:30
मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी स्थानिक नागरिक आणि सरकारमध्ये संवादसेतू बांधत स्थानिकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या.
CM Eknath Shinde ( Marathi News ) : शाळेसाठी आपला जीव धोक्यात घालत कधी पातेल्यातून, तर कधी आई-वडिलांच्या खांद्यावरून प्रवास करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासीबहुल पेठ तालुक्यातील कहांडोळपाडा येथील विद्यार्थ्यांचा येण्या-जाण्याचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाकडे लक्ष देत प्रशासनाला सूचना दिल्यानंतर काल या पुलाचे काम सुरू करण्यात आलं. मागील वर्षाच्या पावसाळ्यात कहांडोळ पाडा या आदिवासी भागातील विद्यार्थी शाळेत जाताना जीव धोक्यात घालत असल्याच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या दृश्यांनी महाराष्ट्र हळहळला होता. याबाबतचे वृत्त पाहिल्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी स्थानिक नागरिक आणि सरकारमध्ये संवादसेतू बांधण्यास सुरुवात केली. तसंच नंतर गावकऱ्यांची मागणी प्रभावीपणे सरकारपर्यंत पोहोचवली आणि आता अखेर शाळकरी मुलांसाठी पूल उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा हा प्रश्न सुटणार असल्याने गावकऱ्यांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू आल्याचे पाहायला मिळाले. "आमच्या भागातील पुलाचा हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. पण आता सरकारने लक्ष देऊन कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आम्ही सरकारचे आभार मानतो," अशा भावना स्थानिकांनी व्यक्त केल्या आहेत.
"पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणार"
आदिवासी पाड्यातील पुलाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर पाहणीसाठी आलेले विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी आपण शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे म्हटले. "राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी या कामाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याचे आदेश आम्हाला दिले आहेत. त्यानुसार हा पूल पूर्ण होईपर्यंत या कामाचा पाठपुरावा केला जाईल," असे चिवटे यांनी सांगितले.
दुसरीकडे, कहांडूळ पाडा येथील पुलाचे काम सुरू झाले असून या कामाचा पाठपुरावा थेट मुख्यमंत्री कार्यालयातून होत असल्याने आम्ही विक्रमी वेळेत हा पूल बांधणार असल्याचा विश्वास कनिष्ठ अभियंता गणेश नाईक यांनी व्यक्त केला.