Eknath Shinde : "आमचे आई-बाप का काढता? मलाही भूकंप करावा लागेल"; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 02:57 PM2022-07-30T14:57:29+5:302022-07-30T15:14:46+5:30
Eknath Shinde Slams Shivsena Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) निशाणा साधला आहे. "तुम्ही आमचे आई-बाप का काढता? असा सवाल करत ठाकरे पिता-पुत्रांवर शिंदेंनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "सत्तेसाठी विश्वासघात कोणी केला?, मलाही भूकंप करावा लागेल. जिथे अन्याय होईल, तेथे पेटून उठा, हे बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं" असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
"हातावर पोट भरणाऱ्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे, त्यांच्या आयुष्यात बदल झाला पाहिजे. या राज्याला विकासनिधी कमी पडू देणार नाही, रिक्षावाले, फेरीवाल्यांसाठी लवकरच महामंडळ. कमी कालावधीत राज्याच्या विकासाचे अनेक निर्णय घेतले" असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मालेगावमध्ये एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पोलीस वसाहतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेताना एकनाथ शिंदे यांच्या तोंडी चुकून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच नाव आले. मात्र नंतर त्यांनी आपली चूक सुधारली. यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे.
देशाचे पंतप्रधान देवेंद्र फडणवीस... शिंदेंच्या तोंडी आपसूक नाव आले आणि...
पोलीस वसाहतीचे उद्घाटन माझ्या हस्ते होणार हा योग होता. पोलीस बांधव हे सण उत्सव, कोविड, ऊन वारा पाऊस असतानाही जनतेचं रक्षण करतात. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलीस पार पाडत आहेत. मनुष्यबळ, यंत्रणा हे देण्याचे काम शासनाचे आहे. पोलिसांसमोर अनेक अडचणी आहेत. जुन्या वसाहती आहेत, लिकेज आहेत, प्लॅस्टर्स पडत आहेत. राज्यभरात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करणार, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.
जुन्या वसाहतींमध्ये आमूलाग्र बदल घडविण्याची गरज आहे. पोलीस रस्त्यावर असताना घराची चिंता नसावी, तर ते अधिक कार्यक्षमताने काम करु शकतील, अतिशय उत्तम काम आता लोकार्पण केलेल्या इमारतीचे आहे. सर्व खात्यांना एकत्र आणून, गृहनिर्माण सोसायटी तयार करणार. उपमुख्यमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांशी यासंदर्भात बोलणे झाले, मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल कमी करा, असे डीजीना सांगितले, त्यामुळे जनतेला त्रास नको, असेही शिंदे म्हणाले. शिवसेना भाजप युतीचे सरकार आले. शेतकऱ्यांसाठी दिलासा देतोय, पेट्रोल डिझेल दर कमी केले, समुद्राला जाणारे पाणी दुष्काळी भागात वळवीत आहोत, आमचा पर्सनल अजेंडा काही नाही, असं शिंदेंनी स्पष्ट केलं.