नाशिक महापालिकेसाठी सीएनजी बसेस दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 07:06 PM2020-03-16T19:06:43+5:302020-03-16T19:10:45+5:30
नाशिक- महापालिकेची बहुचर्चित बस सेवा येत्या १ मे पासून सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असून त्या अनुषंगाने सीएनजी बसेस दाखल होण्यास सुरूवात झाली आहेत. जयपुर मधून दाखल झालेल्या सुमारे २० बसचे पासिंग सोमवारी (दि.१६) आरटीओ कार्यालयात करण्यात आले.
नाशिक- महापालिकेची बहुचर्चित बस सेवा येत्या १ मे पासून सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असून त्या अनुषंगाने सीएनजी बसेस दाखल होण्यास सुरूवात झाली आहेत. जयपुर मधून दाखल झालेल्या सुमारे २० बसचे पासिंग सोमवारी (दि.१६) आरटीओ कार्यालयात करण्यात आले.
दरम्यान, बीएस ४ आणि बीएस ६ या श्रेणीवरून महापालिकेत वाद सुरूच असून विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते आणि गटनेता विलास शिंदे यांनी आयुक्तांकडे याबाबत खुलासा मागितला आहे. या प्रकरणात शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांचे नाव येत असल्याने बोरस्ते यांनी त्याचे खंडन करताना चौधरी यांच्यासंदर्भातील एकही पुरावा दिल्यास आपण राजीनामा देऊ असे आव्हानच बोरस्ते यांनी दिले आहे. तर दुसरीकडे बीएस ४ श्रेणीच्या बस पुरवठ्यासाठीच निविदा काढल्याने आता त्यात बदल केल्यास हे प्रकरण न्यायालयाच्या कचाट्यात अडकेल असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.
महापालिकेच्या वतीने ग्रॉस रूट कॉन्ट्रॅक्ट पध्दतीची बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सीएनजी आणि डिझेल बस पुरवठ्यासाठी एक ठेकदार तर इलेक्ट्रीकल बस सेवेसाठी दुसरा ठेकेदार नियुक्त करण्यात आले आहेत. त्यातील सीएनजी बस पुरवठ्याविषयी आता काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे. केंद्र सरकारने बीएस ६ श्रेणी मान्य केली असून बीएस ४ नाशिकमध्ये येणार असल्याने शिवसेनेचे प्रविण तिदमे, भाजपचे दिनकर पाटील, कॉँग्रेसचे शाहु खैरे आणि अपक्ष गुरूमित बग्गा यांनी त्यास आक्षेप घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी जयपुर येथून बस नाशिककडे निघाल्या होत्या. त्या नाशिकमध्ये दाखल झाल्या आहेत. सुमारे दोनशे बस पंचवटी परीसरात विविध भागात ठेवण्यात आल्याचे समजते. तथापि, वीस बस पासिंगसाठी आरटीओ कार्यालयात दाखल होत्या. त्यानुसार कार्यवाही करण्यात आल्याचे आरटीओच्या सूत्रांनी सांगितले.