मुद्रांक घोटाळा प्रकरणातील सहआरोपीचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:12 AM2021-04-29T04:12:07+5:302021-04-29T04:12:07+5:30
बनावट मुद्रांक तयार करून देवळा तालुक्यातील मेशी येथील झालेल्या शेतजमीन खरेदी प्रकरणात मुख्य सूत्रधार मुद्रांक विक्रेता चंद्रकांत ऊर्फ ...
बनावट मुद्रांक तयार करून देवळा तालुक्यातील मेशी येथील झालेल्या शेतजमीन खरेदी प्रकरणात मुख्य सूत्रधार मुद्रांक विक्रेता चंद्रकांत ऊर्फ मोटू वाघ याला मदत केल्याप्रकरणी दुय्यम निबंधक कार्यालयातील कंत्राटी संगणकचालक आबा पवार याला सहआरोपी करण्यात आले होते. त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी (दि.२६) सुनावणी होती. परंतु जिल्हा सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
देवळा तालुक्यात एकाच क्रमांकाचा मुद्रांक दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे देऊन खरेदी-विक्री झाल्याची घटना ह्या प्रकरणातील पीडित शेतकरी भास्कर धर्मा निकम (रा. तिसगाव ) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर फेब्रुवारी महिन्यात हा मुद्रांक घोटाळा उघडकीस येऊन सर्वत्र खळबळ उडाली होती. मुद्रांक घोटाळा प्रकरणात मुद्रांक विक्रेता गोटू वाघ, संगणकचालक आबा पवार, उमराणा मंडल अधिकारी व्ही.जी. पाटील, मेशी सजेचे तलाठी आर.बी. गुंजाळ, दुय्यम निबंधक प्रकाश गांगोडे आदी आठ संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर ह्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मुद्रांक विक्रेता चंद्रकांत ऊर्फ गोटू वाघ हा महिनाभर फरार झाला होता. जिल्हा सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अखेर तो पोलिसांच्या स्वाधीन झाला होता. आता आबा पवार याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे ह्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मुद्रांक विक्रेता गोटू वाघप्रमाणेच तो पोलिसांना शरण येतो काय, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.
इन्फो
पोलिसांकडे पुरावे
देवळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात कंत्राटी पदावर संगणकचालक म्हणून काम करत असलेल्या आबा पवार या व्यक्तीवर या प्रकरणात सहभागी असल्याचे पुरावे देवळा पोलिसांना मिळाल्याने त्याला या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८, ४७१, ३४ अशा विविध कलमांद्वारे देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.