मुद्रांक घोटाळ्यातील सहआरोपी पोलिसांना शरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:14 AM2021-05-23T04:14:29+5:302021-05-23T04:14:29+5:30
देवळा तालुक्यात एकाच क्रमांकाचा मुद्रांक दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे देऊन खरेदी-विक्री झाल्याची घटना ह्या प्रकरणातील पीडित शेतकरी भास्कर ...
देवळा तालुक्यात एकाच क्रमांकाचा मुद्रांक दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे देऊन खरेदी-विक्री झाल्याची घटना ह्या प्रकरणातील पीडित शेतकरी भास्कर धर्मा निकम ( रा. तिसगाव ) यांनी फेब्रुवारी महिन्यात दिलेल्या तक्रारीनंतर हा मुद्रांक घोटाळा उघडकीस येऊन सर्वत्र खळबळ उडाली होती. विधानसभेत देखील देवळा मुद्रांक घोटाळा प्रकरणाची चर्चा झाली होती. मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर मुद्रांक घोटाळा प्रकरणात मुद्रांक विक्रेता गोटु वाघ, संगणक चालक आबा पवार, उमराणा मंडल अधिकारी व्हि.जी. पाटील, मेशी सजेचे तलाठी आर.बी. गुंजाळ, दुय्यम निबंधक प्रकाश गांगोडे आदी आठ संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर ह्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मुद्रांक विक्रेता चंद्रकांत ऊर्फ गोटू वाघ हा महिनाभर फरार झाला होता. जिल्हा सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अखेर तो पोलिसांच्या स्वाधीन झाला होता. आबा पवार याचा अटकपूर्व जामीन अर्ज दि. २६ एप्रिल रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर गोटु वाघ प्रमाणेच आबा पवार पोलिसांना शरण येतो काय, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेले होते. परंतु त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर सर्व पर्याय संपल्याने अखेर शुक्रवारी (दि.२१) सायंकाळी तो देवळा पोलिसांना शरण आला. पोलिसांनी त्याला सटाणा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे
इन्फो
पोलिसांकडे पुरावे
देवळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात कंत्राटी संगणक चालक म्हणून काम करीत असलेल्या आबा पवार याच्यावर सदर प्रकरणात सहभागी असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाल्याने त्याला सहआरोपी करण्यात आले असून त्याच्या विरोधात कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८, ४७१, ३४ अशा विविध कलमान्वये देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.