कॉ. देशपांडे: नेतृत्वापेक्षा कर्तृत्व मोठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:15 AM2021-04-04T04:15:12+5:302021-04-04T04:15:12+5:30
----- कॉ. श्रीधर देशपांडे एलआयसी युनियनचे नेते होते. त्या आधी गुलालवाडी व्यायामशाळेचे विश्वस्त होते. नाशिकमधील सिटूच्या उभारणीत त्यांचा मोठा ...
-----
कॉ. श्रीधर देशपांडे एलआयसी युनियनचे नेते होते. त्या आधी गुलालवाडी व्यायामशाळेचे विश्वस्त होते. नाशिकमधील सिटूच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. समाजातील सर्व घटकातील व सर्व स्तरांतील व्यक्तींबरोबर त्यांची मैत्री होती. कार्यकर्ते घडविण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. राजकारणात असूनही हा माणूस खूप वेगळा ठरला. मात्र राजकारणातील त्यांची बैठक ही मार्क्सवाद, लोकशाही, समाजवाद या तत्त्वावर आधारित होती. १९६० - ७० च्या दशकात डाव्या चळवळीत काम करण्याआधी त्यांनी वेगवेगळ्या राजकीय विचार प्रवाहांचा चिकित्सक अभ्यास केला. त्या अभ्यासानंतर सामाजिक, राजकीय बदल घडविण्यासाठी डाव्या विचारसरणी व चळवळीची गरज आहे या निष्कर्षावर पोहोचल्यावर त्यांनी या चळवळीला वाहून घेतले व अखेरपर्यंत चळवळीशी एकनिष्ठ राहिले. विचारधारेशी एकनिष्ठ राहणे म्हणजे बंदीस्तपणा नाही, हे त्यांच्या आचरणात जाणवायचे. आजूबाजूच्या राजकीय, सामाजिक प्रश्नांची मांडणी मार्क्सवादी दृष्टिकोनातून करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. पण ही मांडणी करत असताना त्यांचे लिखाण बोजड झाले नाही. सर्वसामान्यांमध्ये राजकीय सामाजिक प्रश्नांची चिकित्सा करण्याची वृत्ती निर्माण व्हावी अशा अनुषंगाने त्यांचे लिखाण असायचे. त्यांची राजकारणात किंवा समाजकारणात येण्यामागची मूळ प्रेरणा ‘बदल’ घडवून आणण्याची असल्याने, त्यांना पदासक्ती कधीच नव्हती. आजच्या काळातील सवंग लोकप्रियतेचे राजकारण आणि उथळ राजकीय परिस्थितीला त्यांचा अभ्यास, त्यांची राजकीय समज ही परस्पर विरोधी ठरणारी होती. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध काम करताना सध्याच्या वातावरणात होणारी दमछाक, सातत्याने येणारे अपयश पाहता कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य येते. पण कॉम्रेड कधीच निराश नसायचे, त्यांनी आपल्या सोबत काम करणाऱ्यांच नाही तर सोबत असणाऱ्या प्रत्येकामध्ये उमेद जागी ठेवली होती. त्यांची चिकित्सक विचारसरणी, नैराश्यकडे न झुकता झोकून काम करण्याची चिकाटी होती. त्यामुळे एखादा प्रश्न हातात घेतल्यावर संपूर्ण ऊर्जेने तो तडीस नेण्यासाठी प्रयत्नशील असायचे. यामध्ये सामाजिक प्रश्न असोत किंवा कुणाचे वैयक्तिक प्रश्न असो, त्यांचा सहभाग संपूर्ण असायचा. त्यांच्या निधनामुळे डाव्या चळवळीची हानी झाली आहे.
- डॉ. डी. एल. कराड (लेखक सीटू या कामगार संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत.)