मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना घेराव
By admin | Published: October 6, 2016 01:38 AM2016-10-06T01:38:39+5:302016-10-06T01:39:00+5:30
प्रभाग ४१ : तिडकेनगर, प्रियंका पार्क रहिवाशांचे आरोग्य धोक्यात
सिडको : येथील तिडकेनगर, प्रियंका पार्क परिसरातील मोकळ्या भूखंडांवर वर्षानुवर्षे साचलेला व कुजलेला कचरा आणि पालापाचोळ्यासह एका सोसायटीच्या तळमजल्यात वाढलेल्या झुडपांमुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना डेंग्यूची लागण झाली असून, याबाबत आज पाहणी करण्यासाठी आलेल्या मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घातला.
सिडकोतील प्रभाग ४१ मध्ये तिडकेनगर, प्रियंका पार्क या परिसराचा समावेश असून, याठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून संपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. याच भागात असलेल्या एका सोसायटीच्या तळमजल्यात मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली असून, पाण्याची साठवणूकही केली असल्याने अनेकजण विविध आजारांनी त्रस्त असून यात काहींना डेंग्यू आजाराची लागण झाल्याचेही यावेळी उपस्थित नागरिकांनी सांगितले. याबाबत आज मनपाचे आरोग्य अधिकारी टेकाडे व विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांनी तिडकेनगर, प्रियंका पार्क व परिसरात फिरून समस्यांची पाहणी केली. यावेळी पाहणी दौऱ्यात उपस्थित शेकडो नागरिकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार करीत घेराव
घातला. यावेळी या अधिकाऱ्यांनी संबंधितांना स्वच्छता करण्याबाबत सूचना केल्या.
यावेळी परिसरातील संजय जाधव, सुनील चौधरी, बबन नवले, सुभाष पाटील, डॉ. पराग सुपे, अमृतराव माळे, नाना खैरनार, सुजित काळसेकर, रमेश चौहान, प्रियंका सरोदे, जयंत चौधरी, प्रशांत कुलकर्णी, संगीता चोपडे आदिंसह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)