कोचिंग क्लासेसचा कायदा अडकला लालफितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 01:11 AM2019-05-26T01:11:03+5:302019-05-26T01:11:31+5:30
सुरत येथे सरथाना येथे एका इमारतीतील चौथ्या मजल्यावर चालवलेल्या जाणाऱ्या कोचिंग क्लासमध्ये आग लागल्याने त्यापासून बचावण्यासाठी उड्या घेणारे वीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
नाशिक : सुरत येथे सरथाना येथे एका इमारतीतील चौथ्या मजल्यावर चालवलेल्या जाणाऱ्या कोचिंग क्लासमध्ये आग लागल्याने त्यापासून बचावण्यासाठी उड्या घेणारे वीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर नाशिकसह राज्यातील खासगी कोचिंग क्लासेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारने यासंदर्भात केलेले कायद्याचे प्रारूप विधानसभेत अडकले आहे. अर्थात, नाशिकमधील कोचिंग क्लासेस संघटनेने मात्र अशाप्रकारच्या दुर्घटना घडू नये यासाठी पुढाकार घेतला असून, काय सुरक्षा व्यवस्था कराव्या हे तपासण्यासाठी रविवारी (दि.२६) तातडीची बैठक बोलविली आहे.
बहुमजली इमारतीत क्लास सुरू असेल तर काय काळजी घ्यावी तसेच अग्निशमनाची कोणती साधने सज्ज ठेवावीत याबाबत या बैठकीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे, याची माहिती संबंधिताना देण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी दिली.
सुरतमध्ये तक्षशीला कॉम्प्लेक्समध्ये चौथ्या मजल्यावर टेरेस बंद करून कोचिंग क्लास चालविला जात होता.
अवघ्या २५ संस्थांनीच केले आॅडिट
महापालिकेने गेल्यावर्षी सर्व व्यापारी संकुले, हॉटेल्स आणि शिक्षण संस्थांसारख्या सर्व आस्थापनांना फायर आॅडिट करून उपाययोजना न केल्यास इमारती सील करण्यात येईल, अशी नोटीस जारी केली होती. मात्र त्यांनतर हा विषय मागे पडला. वर्षभराच्या कालावधीत जेमतेम पंचवीस आस्थापनांनीच असे आॅडिट केल्याची महापालिका दफ्तरी नोंद आहे.
नाशिकमध्ये असलेल्या खासगी कोचिंग क्लासेस संघटनेच्या सभासदांनी आपल्या क्लासमध्ये फायर सेफ्टी, फायर एस्टिंगविशर्स, येण्या-जाण्यासाठी मोकळे जीने, सीसीटीव्ही अशा सुविधा केल्या पाहिजे. महापालिका आणि पोलिसांनी दरवर्षी त्याचे आॅडिट केले पाहिजे. पालकांनीदेखील सुरक्षितेच्या साधनांची खात्री करूनच पाल्यांना संबंधित क्लासमध्ये प्रवेश घ्यावेत.
- जयंत मुळे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संघटना