नाशिक महापालिकेत युतीची सत्ता सर्वाधिक काळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:18 AM2021-08-12T04:18:15+5:302021-08-12T04:18:15+5:30

नाशिक : महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आल्यानंतर सर्वाधिक काळ सत्ता शिवसेना-भाजप युतीची राहिली असून शिवसेना आणि भाजप युती म्हणून सात ...

Coalition rule in Nashik Municipal Corporation for the longest time! | नाशिक महापालिकेत युतीची सत्ता सर्वाधिक काळ!

नाशिक महापालिकेत युतीची सत्ता सर्वाधिक काळ!

Next

नाशिक : महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आल्यानंतर सर्वाधिक काळ सत्ता शिवसेना-भाजप युतीची राहिली असून शिवसेना आणि भाजप युती म्हणून सात वेळा महापौरपद राहिले आहे. स्वबळाचा विचार केला तर भाजपालाच पंचवीस वर्षात पूर्ण बहुमत प्राप्त झाल्याने त्यांना दोन वेळा महापौरपद मिळाले आहे. विशेष म्हणजे अपुऱ्या संख्याबळावर का होईना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोनवेळा महापौरपद मिळवले आहे. परंतु राष्ट्रवादीला मात्र एकदाही खाते खोलता आलेले नाही.

नाशिक महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे सत्ता कोणाची येणार या विषयी राजकीय पक्ष दावे-प्रतिदावे मांडत आहेत. परंतु गेल्या पाच पंचवार्षिक निवडणुकींचा धांडोळा घेतला तर सर्वाधिक काळ सत्ता शिवसेना-भाजपाकडे राहिली आहे. आणि गेल्या तीस वर्षाच्या इतिहासात प्रथमच भाजपला पूर्ण बहुमत मिळाले असून त्यामुळे त्यांच्याकडील महापौरपदाचे निर्भेळ यश मिळाले आहे.

नाशिक महापालिकेची स्थापना ७ नोव्हेंबर १९८२ रोजी झाली. मात्र, सुरुवातीला दहा वर्षे महापालिकेत प्रशासकीय राजवट होती. त्यानंतर १९९२ मध्ये पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यात काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले नसले तरी १६ अपक्ष नगरसेवकांच्या साहाय्याने काँग्रेस पक्षाच्या ताब्यात सत्ता होती. त्यानुसार १९९२ ते ९३ आणि ९३ ते ९४ असे दोन वर्षे काँग्रेसचे नेते शांतारामबापू कोंडाजी वावरे यांच्याकडे महापौरपद होते. त्यानंतर १९९४ ते ९५ पुन्हा कॉंग्रेस पक्षाचे पंडितराव खैरे यांच्याकडे महापौरपद हेाते. ९५ ते ९६ हे एक वर्ष केवळ काँग्रेस पक्षात फूट पडल्याने युती पुरस्कृत अपक्ष ॲड. उत्तमराव ढिकले हे महापौर झाले परंतु नंतर मात्र काँग्रेसचे प्रकाश मते पुन्हा महापौर झाले.

यानंतर १९९९ ते २००१ या तीन वर्षात काँग्रेस पक्षाच्या डॉ. शोभा बच्छाव महापौर झाल्या. त्या वगळता आजवर या पक्षाला पुन्हा सत्तेचा सूर गवसला नाही. दरम्यान, १९९५ मध्ये राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर महापालिकेतील सत्ता समीकरणे बदलली होती. १९९७ मध्ये शिवसेना आणि भाजपा युतीचे बहुमत हुकले असले तरी तीन अपक्षांच्या जीवावर सत्तांतर झाले. वसंत गिते हे शिवसेनेचे पहिले महापौर म्हणून निवडले गेले. त्यानंतर त्यांनी अपक्ष गटाने केलेल्या मदतीची परतफेड अशोक दिवे यांना महापौर करून केली. पुढील वर्षी शिवसेनेच्या (कै.) सुरेखा भोसले यांचे महापौरपद अटळ असताना सेना-भाजपातील फुटीरांमुळे कॉंग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांना महापौरपद मिळाले. काँग्रेसचे हे शेवटचे महापौरपद. त्यानंतर मात्र, युतीनेच वर्चस्व राखले. २००२ मध्ये शिवसेनेचे ३८ आणि भाजपाचे २२ असे ६० नगरसेवकांचे बहुमत असल्याने दशरथ पाटील आधी आणि त्यानंतर कमी संख्याबळ असूनही भाजपाच्या बाळासाहेब सानप यांना महापौरपदाची संधी मिळाली. २००७ मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. मात्र, अपक्ष विनायक पांडे यांनी जुगाड जमवत महापौरपद पटकावले. त्यांच्यानंतर शिवसेनेच्याच नयना घोलप यांनाही संधी मिळाली. मात्र, नंतर मात्र सलग दहा वर्षे शिवसेनाही सत्तेपासून वंचित आहे.

इन्फो...

२०१२ मध्ये मनसेच्या लाटेत शिवसेनेला दणका बसला. मनसेचे चाळीस नगरसेवक निवडून आले आणि आधी भाजप तर नंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी अपक्षाच्या पाठबळावर पहिली अडीच वर्षे ॲड. यतीन वाघ आणि नंतरची अडीच वर्षे अशोक मूर्तडक यांना संधी मिळाली. २०१७ मध्ये तर संपूर्ण राजकारणच बदलले, शिवसेना आणि भाजप राज्यात सत्तेत असतानाही सलग दुसऱ्यावेळी स्वतंत्र निवडणूक लढले आणि त्यात ६६ नगरसेवकांसह भाजपने बहुमत मिळवले आहे. आधी अडीच वर्षे पक्षाच्या रंजना भानसी यांनी महापौरपद भूषवले आणि आता सतीश कुलकर्णी हे पद भूषवत आहेत.

इन्फो...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यानंतर महापालिकेत अनेकदा कळीची भूमिका या पक्षाने निभावली. विनायक पांडे यांच्या महापौरपदासाठी राष्ट्रवादीची किंगमेकरची भूमिका होती. त्यानंतर आधी मनसेला सत्ता देताना आधी विरोध पुढील अडीच वर्षे समर्थन अशा भूमिकेतही राष्ट्रवादी राहिली. परंतु बाहुबळ असूनही या पक्षाला एकदाही महापौरपदाची संधी मिळू शकलेली नाही.

Web Title: Coalition rule in Nashik Municipal Corporation for the longest time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.